fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

Nehru All India Inter-University Hockey Tournament – व्हीबीएसपी जौनपूर आणि पुणे विद्यापीठ उपांत्य फेरीत

पुणे – वीर बहादूर सिंग पूर्वांचल (व्हीबीएसपी) विद्यापीठ, जौनपूर आणि सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संघर्षपूर्ण विजयासह येथे सुरु असलेल्या एसएनबीपी २८व्या नेहरु अखिल भारतीयआंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अखिल भारतीय विद्यापीठ संघटना आणि हॉकी इंडियाच्या सहकार्याने सुरु असलेल्या या स्पर्धेस एसएनबीपी संस्थेचा आर्थिक पुरस्कार आहे. पिंपरीत नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती कमालीच्या चुरशीने खेळल्या गेल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने बंगळूर विद्यापीठ संघाचा तगडा बचाव भेदत १-० असा विजय मिळविला. त्याचवेळी गेल्यावर्षी तिसरा क्रमांक मिळविलेल्या बंगळूर सिटी विद्यापीठ संघाचा प्रतिकार तोकडा पडला. त्यांना व्हीबीएसपी संघाकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये ३-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला. नियोजित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.

पुणे विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी पूर्ण क्षमतेने खेळ केला. त्यांनी बंगळूर विद्यापीठाच्या आक्रमकांना नुसतेच रोखले नाही, तर त्यांचा कडवा बचावही भेदण्यात यश मिळविले. पूर्वार्धातील दुसऱ्या सत्रात तालेब शाह (३०वे मिनिट) याने रिव्हर्स हिटवर बंगळूर विद्यापीठाचा गोलरक्षक श्रेयस सोमय्याला चकवले. त्यानंतर पुणे विद्यापीठ संघाने आपला बचाव भक्कम राखला. उत्तरार्धात तिसऱ्या सत्रात बंगळूरच्या चेतन एम. के. याला गोल करण्याची सुरेख संधी होती. जोरदार मुसंडी मारल्यावर त्याला मोकळ्या गोलपोस्टचा अचूक फायदा उठवता आला नाही. बंगळूरच्या खेळाडूंनी अखेरच्या सत्रात कमालीचा वेगवान खेळ केला. अखेरच्या मिनिटापर्यंत त्यांनी तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण, बंगळूर संघाच्या खेळाडूंना त्याचाही फायदा उठवता आला नाही.

त्यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व पेरीत व्हीबीएसपी विद्यापीठ आणि बंगळूर सिटी विद्यापीठ संघां दरम्यान सामना कमालीचा चुरशीचा झाला. पूर्वार्धातील पहिले सत्र तसे वायाच गेले. मात्र, दुसऱ्या सत्रात १८व्या मिनिटाला गोकावी वसंत कुमार यांनी प्रतिआक्रमण करत बंगळूर सिटी संघाला आघाडी मिळवून दिली. पेनल्टी कॉर्नर वाचवल्यावर बंगळूर सिटीच्या खेळाडूंनी कमालीची वेगवान चाल रचली. त्यांच्या मुटागर हरेश याने उजव्या बाजूने चाल रचताना खोलवर मुसंडी मारली होती. व्हीबीएसपी संघाचे गोकावीकडे लक्षच नव्हते. मुटागरने त्याला पास दिला आणि त्याने गोलरक्षक निगम प्रतिक याला सुरेख चकवून संघाचे खाते उघडले.

व्हीबीएसपी संघाच्या खेळाडूंनी स्थिरावण्यास पुरेसा वेळ घेतला. परिपूर्ण नियोजन करूनच ते खेळ करत होते. त्यांनी २६व्या मिनिटाला मिळालेल्या इडायरेक्ट पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधली. मनिष सहानी याने हा गोल केला. मध्यंतरापर्यंत १-१ ही बरोबरी सुटली नव्हती. उत्तरार्धात व्हीबीएसपी संघाने आघाडी घेतली. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला त्यांचे विजेंद्र सिंग याने उत्तम सिंगकडून आलेल्या पासवर हा गोल केला. अर्थात, त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या ५७व्या मिनिटाला मुटागर हरेश याने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेरपर्यंत ही बरोबरीची कोंडी सुटू शकली नाही.

शूटआऊट मध्ये सुरज शाही, विजेंद्र सिंग, उत्तम सिंग यांनी व्हीबीएसपी संघासाठी गोल केले. बंगळूरकडून गणेश माजी आणि मुटागर हरेश यांनाच यश आले. जौनपूर संघाच्या अरुण शहानी आणि गगन राजभार यांचे गोल हुकले. बंगळूरच्या पवन, भारत आणि पुनित या तिघांना लक्ष्य गाठता आले नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading