संवाद पुणे संस्थे तर्फे पुण्यातील क्रिडा क्षेत्रातील १६ कर्तुत्ववान महिलांना ‘क्रीडा राज्ञी’ पुरस्कार जाहीर !

पुणे : संवाद पुणे, सोहन मंगल फाऊंडेशन व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला क्रीडा क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणार्‍या पुणे शहरातील महिला खेळाडू, प्रशिक्षक, संघटक अशा १६ कर्तृत्ववान महिलांचा ‘क्रीडा राज्ञी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. माजी ऑलिंपियन आणि पहिल्या भारतीय महिला ऑलिम्पिक हॉकी संघाच्या उपकर्णधार रेखा भिडे यांना यावेळी ‘क्रीडा राज्ञी’ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन, सोहन मंगल फाऊंडेशनचे अशोक गुंदेचा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संचालिका निकीता मोघे आणि मार्गदर्शक सचिन ईटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितले की, पुणे शहरातील क्रीडा क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणार्‍या महिला खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांचा गौरव करणार आहोत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्याच्या पुर्वसंधेला अशा क्रीडा नैपुण्यवान १६ महिलांना ‘क्रीडा राज्ञी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्काराची संकल्पना ‘संवाद पुणे’ या संस्थेची असून या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यापुर्वी २०१९ मध्ये प्रथम या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर करोना महामारीमुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता.

माजी ऑलिंपियन रेखा भिडे-मुंडफण यांना ‘क्रीडा राज्ञी’ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. याबरोबरच देविका वैद्य (आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू), साध्वी धुरी, रिया तावरी (जलतरणपटू), आम्रपाली गलांडे, मानसी रोडे (कबड्डीपटू), प्रगती गायकवाड (कुस्तीपटू), तिशा संचेती (तिरंदाज), आदिती डोंगरे (सायकलपटू), निशिता कोतवाल (तायक्वांदो), कोमल दारवटकर (खो-खो), समृद्धी कूलकर्णी (मॅरेथॉन), मनाली देव (आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक), पूर्वी गांजवे (युद्धकला निपुण), सुवर्णा पाठक-देवळाणकर (पीएच.डी), विद्या पाठारे-हनवटे (पीएच.डी) आणि प्रतिभा चंद्रन (महिला क्रीडा पत्रकार) या कर्तुत्ववान महिलांना या वर्षीचा क्रिडा राज्ञी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ७ मार्च २०२२ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी ५: वाजता होणार आहे. राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री माननीय श्री. सुनिल केदार आणि सोहन मंगल फाऊंडेशनचे अशोक गुंदेचा, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे.

जगातील असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यामध्ये आता महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले नाही. आजच्या नवीन युगामध्ये स्त्री शक्तीने आपला ठसा सर्वच क्षेत्रामध्ये उमटवला असून आपल्या दैदीप्यमान कर्तबगारीने तिने एक आदर्श निर्माण केला आहे. अशा ‘ती’ चा प्रत्येकाला अभिमान वाटत आला आहे. या गौरवामुळे अनेक उदयोन्मुख महिलांना एक नवी प्रेरणा मिळावी आणि भविष्यात अशा अनेक ‘तीं’नी क्रीडा क्षेत्रात पुण्याचे नाव उज्वल करावे, हा या गौरव सोहळ्यामागचा मुख्य उद्देश आहे, असे सुनिल महाजन व सचिन ईटकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: