Movie Review – झुंड (Jhund)

‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ अशा एकापेक्षा एक कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या (Nagaraj Manjule) ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज हिंदी चित्रपट करतोय, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन ( Amitabh Bacchan) यांना घेऊन बॉलीवूड मध्ये एन्ट्री करतोय. यामुळे या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता होती. टीजर, गाणी आणि ट्रेलर आल्या नंतर ‘झुंड’ बद्दलची उत्कंठा अधिक वाढली. नागराज मंजुळे चा चित्रपट म्हटलं की कथे मधील वेगळेपण, सामाजिक संदर्भ आणि संवेदनशील विषयाची समर्पक मांडणी हे बघायला मिळते, ‘झुंड’ सुद्धा या अपेक्षा पूर्ण करतो.

‘झुंड’ ही कथा फुटबॉल प्रशिक्षक विजय बोराडे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित आहे. नागपूर शहरात राहणाऱ्या विजय बोराडे यांनी झोपडपट्टी भागातील मुलांना फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून एकत्र आणून घडवलेल्या सामाजिक क्रांतीची ही कथा आहे. झोपडपट्टी म्हटलं की तिथल्या लोकांकडे बघण्याचा ‘इंडियन’ दृष्टिकोन वेगळा आहे. त्या लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न भारत आणि इंडियाच्या सीमारेषा कधी ओलांडात नाहीत किंबहुना त्या प्रश्नांची उकल होऊच नये यासाठी इथले प्रशासन, सामाजिक – राजकीय व्यवस्था सातत्याने काळजी घेत असते. सहाजिकच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांमध्ये कितीही टॅलेंट असले तरी झोपडपट्टीतल्या भारतामधून इंडिया मध्ये प्रवेश करणे सहजासहजी शक्य होत नाही. झोपडपट्टीतील मुलांचा हाच संघर्ष नागराज मुंजुळे याने ‘झुंड’ मधून अधोरेखित केला आहे.

आपल्याकडे सामाजिक विषयांवरील चित्रपटात अनेक समस्या मांडल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात परंतु त्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग काय? यांचे उत्तर दिले जात नाही. नागराज मंजुळे ‘झुंड’ मधून फक्त सामाजिक प्रश्नाला वाचा फोडत नाही तर सांस्कृतिक राष्ट्रवादावर सडेतोड भासी करत बहुतांश प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या माध्यमातून देतो हे त्याचे वेगळेपण आहे. सामाजिक, संवेदनशील विषयाला रटाळपणे मांडण्याची आपल्याकडे पद्धत आहे, नागराज मात्र थेट फुल्ल एन्टरटेन्मेंट करत त्या प्रश्नांची जाणीव करून देतो, ‘झुंड’ मध्येही त्याने तेच अतिशय चपखलपणे मांडले आहे.

‘कंटेट’ च्या बढाया मारणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीने आजपर्यंत भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, विचारांची कधीही दखल घेतली गेली नाही. अलीकडे दाक्षिणात्य इंडस्ट्री मध्ये ‘जयभीम’, ‘काला’. ‘कबाली’, ‘असुरण’ अशा मेनस्ट्रीम कलाकार असलेल्या चित्रपटांमधून बाबसाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे, त्यांचे महत्व पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांची कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटात मात्र कोर्टरूम मध्ये लटकवलेल्या फोटो मधले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कथेत प्रतिबिंबित होताना दिसले नाहीत. दिग्दर्शक नागारज मंजुळेने हे धाडस करत ‘भीमजयंती’ बिगस्क्रीनवर दाखवत ‘बडी फिल्म, बडे पर्देपर’ हे म्हणणे सार्थ ठरविले आहे.

‘झुंड’ मधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर नागराज मंजुळेने शोधलेले सर्वच हिरे चमकतात हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाले आहे. ‘झुंड’ मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या विजय बोराडे यांना तोड नाही. अंकुश आणि बाबू या जोडीने कमाल केली आहे. ते दोघे कुठेही अभिनय करताना दिसत नाहीत त्यांची प्रत्येक फ्रेम, प्रत्येक वाक्य हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग असल्याचे दिसते. किशोर कदम, छाया कदम, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.

संगीतकार अजय – अतुल यांचे अप्रतिम संगीत ‘झुंड’ ला लाभले आहे. ‘आया ये झुंड है’ असो की ‘लफडा’ गाणी अप्रतिम आहेत. गाण्यांचे शब्दही अतिशय मार्मिकपणे व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. सुधाकर व्यंकट रेड्डी ने आपल्या कॅमेरयच्या माध्यामातून जादू केली आहे.

‘झुंड’ बद्दल एकंदरीत सांगयाचे तर बॉलीवूडचा ‘सोकॉल्ड हिरोझम’ मोडीत काढणार हा चित्रपट आहे. सामाजिक, संवेदनशील विषयावर भाष्य करत त्यावर तोडगा सुचविणे सुद्धा महत्वाचे असते नागराज ‘झुंड’ मध्ये ते करतो. अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकारांसाठी, अजय – अतुल च्या गाण्यांसाठी तर तुम्ही ‘झुंड’ बघा पण त्याही पलीकडे जाऊन भारत आणि इंडियाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत नव्या भारताची निर्मिती करू पहाणाऱ्य नागराज मंजुळेच्या संवेदनशील जाणिवेसाठी ‘झुंड’ बघायला हवा.

चित्रपट – झुंड

दिग्दर्शक – नागराज मंजुळे

निर्मिती – टी सिरिज, आटपाट

संगीत – अजय अतुल

डिओपी – सुधाकर व्यंकट रेड्डी

कलाकार – अमिताभ बच्चन, अंकुश, बाबू, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे, किशोर कदम, छाया कदम इ.

रेटिंग – ****

भूपाल पंडित

pbhupal358@gmail.com

Leave a Reply

%d bloggers like this: