Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

तब्बल २०० विद्यार्थ्यांनी मराठी सुलेखन करीत व्यक्त केले अक्षरांवरील प्रेम

पुणे : सुंदर अक्षर हाच खरा दागिना…एकी हेच बळ… माझे माझ्या अक्षरावर प्रेम आहे… असे सुविचार कागदावर सुलेखनाद्वारे लिहित एकाच वेळी २०० विद्यार्थ्यांनी अक्षरावरील प्रेम व्यक्त केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीत सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतानाच साहित्यिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठीचे महत्त्व उपस्थितांसमोर उलगडले.

अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि व्हिनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. पुण्यातील २५ शाळांमधून इयत्ता ३री ते ८वी पर्यंतचे तब्बल १५ हजारहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत प्रातिनिधीक स्वरुपात सुमारे २०० विद्यार्थी एकाच वेळी सुलेखन केले. यावेळी अक्षर रसिक सुलेखन वर्गाचे शैलेश जोशी, व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदांनी, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ आदी उपस्थित होते.

नवीन मराठी शाळेत साहित्यिक आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, वि.स.खांडेकर, विं.दा.करंदीकर, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, शांता शेळके, इंदिरा संत, दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर, विश्वास पाटील, रणजित देसाई, अरुणा ढेरे आदींच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले. स्पर्धेत १६ मराठी माध्यमाच्या शाळा तर ९ इंग्लिश माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या आहेत. गेली ४७ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव मिळवलेले व्हीनस ट्रेडर्स आणि २५ वर्षांपासून सुलेखन क्षेत्रात अलौकिकपणे नाव मिळवलेले अक्षर रसिक सुलेखन वर्ग हे मराठी लेखन वृद्धीच्या दृष्टीने स्पर्धेद्वारे प्रयत्न करीत आहेत.

शैलेश जोशी म्हणाले, सध्या लेखन कमी झाल्याने हस्ताक्षराची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे हाताची बोट दुखणे, पटापट लिहू न शकणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. म्हणून आता शाळा सुरू झाल्या असल्याने त्यांना पुन्हा एकदा त्याचे महत्त्व समजावे, हस्ताक्षराची आवड निर्माण व्हावी म्हणून मराठी राजभाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून क्लिक पेन कंपनी,सॅपलेंट यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading