Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

आजारपण टाळण्याकरीता योग हा प्रभावी उपाय – डॉ.दीपक टिळक

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाची धावपळ वाढली आहे. वेगवेगळ्या आजाराचे स्वरूपही बदलले आहे. आजार कोणताही असो त्यात मानसिक खच्चीकरण होते. सर्व प्रकारच्या आजारावर योगा हा एकमेव प्रभावी उपाय आहे. योगामुळे मन आणि शरीराच्या स्थिरतेचा मेळ घालता येतो. त्यामुळे आजारपण टाळायचे असेल, तर योगाचा स्वीकार केला पाहिजे, असे मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी केले.

योग विद्या धाम पुणे तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बा. शि. दामले लिखित प्रिन्सिपल्स आॅफ योगा प्रॅक्टिस अ‍ॅण्ड थेरेपी या पुस्तकाचे प्रकाशन केसरी वाडयातील लोकमान्य सभागृहात झाले. यावेळी लेखक डॉ. बा. शि. दामले, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव ढेरे, कार्याध्यक्ष वैद्य लक्ष्मण लावगनकर, कार्यवाह गजानन दीक्षित आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ.दीपक टिळक म्हणाले, योगाला केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात मान्यता मिळाली आहे. धावपळीच्या युगात शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा उत्तम उपाय आहे. आता योगाचा अभ्यासक्रमांत देखील समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. 

डॉ. बा. शि. दामले म्हणाले, खेळ, व्यायामपद्धती आपल्या वाढत्या वयानुसार मागे पडतात. मात्र, योगाचा अभ्यास जन्मभर करता येतो. शरीर व मनाचे स्वाथ्य उत्तम ठेवणे, हे योगाचे ध्येय आहे. रोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देखील योगाकडे पहायल हवे. योग हे आजारावरील चिकित्सा शास्त्र नसून सहयोगी शास्त्र आहे. वैद्यक शास्त्रासोबत देखील ते चांगल्या पद्धतीने कार्य करु शकते.

डॉ.राजीव ढेरे म्हणाले, आधुनिक शास्त्र व योगाची योग्य सांगड घालून या पुस्तकामध्ये विचार मांडण्यात आले आहेत. योगाचे फायदे-तोटे सर्वच अंगांनी पुस्तकात विश्लेषण आहे. योग हे केवळ आसनांपुरते मर्यादित असलेले शास्त्र नसून शारिरीक व मानसिक व्याधी दूर ठेवण्याची ताकद त्यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्य लक्ष्मण लावगनकर म्हणाले, योग विद्या धाम संस्थेच्या माध्यमातून सूर्यनमस्कार, योगासने, श्वसन-प्राणायाम यांचा अभ्यास शिकविला जातो. तसेच योगोपचाराविषयी देखील मार्गदर्शन केले जाते. राज्यस्तरीय योगासन स्पर्धांच्या माध्यमातून योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न देखील संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

गजानन दीक्षित यांनी स्वागत केले. प्रा. लंबोदर मांडके यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र मराठे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading