Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

वैज्ञानिक संशोधनात आवड, संयम आणि सातत्य गरजेचे -डॉ.नितीन करमळकर

पुणे : वैज्ञानिक संशोधन कसे चालते, याची योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरीता इंडस्ट्री आणि महाविद्यालये यामध्ये देवाणघेवाण व समन्वय असणे गरजेचे आहे. तरच प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधनाची परिपूर्ण माहिती मिळेल. विज्ञान व तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी पार्क देखील याकरीता उपयुक्त असून वैज्ञानिक संशोधन करताना विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलची आवड, संयम आणि सातत्य असणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, मुख्य वैज्ञानिक सल्लागार समिती भारत सरकार यांचे कार्यालय आणि विज्ञान प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रसार महोत्सवाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचे उद््घाटन झाले. यावेळी ए.आर.डी.ई. चे संचालक व उत्कृष्ट वैज्ञानिक डॉ.व्ही.व्ही.राव, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्राचार्य प्रा.डॉ.सविता दातार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स.प.महाविद्यालयात दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव विनामूल्य खुला असणार आहे. शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, पराग ठाकूर, विज्ञान भारतीच्या मानसी मालेगावकर, विज्ञानमंडळ प्रमुख डॉ.संदीप काकडे, समन्वयक डॉ.गीतांजली फाटक, डॉ.सुचेता गायकवाड, मंदार उपासनी आणि सर्व प्राध्यापकांनी महोत्सवाचे नियोजन केले आहे.

डॉ.नितीन करमळकर म्हणाले, प्रत्येक वेळी नवे संशोधन करणे गरजेचे नसते. तर, जुन्या संशोधनात नाविन्यपूर्ण गोष्टी शोधणे देखील संशोधनाचा एक भाग आहे. भारत देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असताना संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

महोत्सवात ७५ शास्त्रज्ञ आणि ७५ वैज्ञानिक शोध यांची भित्तिचित्रे बघण्यासाठी उपलब्ध होतील. तसेच डीआरडीओ यांच्यातर्फे भित्तिचित्रे आणि मॉडेल्स देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. दि.२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत भारतातील ७५ शहरांमध्ये या विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे हा विज्ञान महोत्सव सुरु आहे.

विज्ञान महोत्सवात विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान पुस्तक मेळा, विज्ञान साहित्य उत्सव, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञानामृत प्रश्नमंजुषा अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. श्रीकृष्ण चितळे, केशव वझे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.सविता दातार यांनी प्रास्ताविक केले. डॉ.स्मितल पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुचेता गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading