Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

नऱ्हे गावात होतीय सातत्याने वाहतूक कोंडी

पुणे : नऱ्हे गाव पालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतरही गावातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. यात मुख्य म्हणजे गावातील विविध रस्त्यांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रस्ते अरुंद बनले असून यामुळे नऱ्हे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तरी पालिकेने या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते रुंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नऱ्हे गाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक वसाहत आहेत. यामुळे हा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. यामुळे या परिसरात दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. या सर्व नागरिकांना वाहतुकीसाठी प्रशस्त आणि मोकळे रस्ते हवे आहेत.

नऱ्हे – धायरी, पारी कंपनी चौक ते श्री कंट्रोल चौक, भूमकर चौक, लाडली स्टोअर ते गंधर्व हॉटेल, गंधर्व हॉटेल ते नऱ्हे सेल्फी पॉइंट आदी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामध्ये भाजीपाला, फळ विक्रेते, विविध व्यवसाय करणारे दुकानदार, हॉटेल व्यवसायिक आदींनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे आधीच अरुंद असणारे रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. तसेच मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळील सेवा रस्त्यांवरही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यात सदा-शुभ इमारती बाहेरील बाजूस अतिक्रमणे आहेत.

या अतिक्रमणामुळे अनेक वाहनचालकांना पर्याय नसताना महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे, यामुळे वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत यात अनेकदा भीषण अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तरी पालिकेने येथील अतिक्रमणे हटवून वाहतूक व्यवस्था सक्षम करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे भूपेंद्र मोरे यांनी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या या परिसरात अरुंद रस्त्यांमुळे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असते यामुळे वाहनचालकांना तसंतास वाहतूक कोंडीत ताटकळत थांबावे लागत आहे. तरी या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून रस्ते विकसित करावेत तसेच पादचारी नागरिकांसाठी पादचारी पथ निर्माण करावेत जेणेकरून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि लाखो नागरिकांना वाहतुक कोंडीतून सुटका मिळेल.

  • भूपेंद्र मोरे
    सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading