स्पोर्ट्सफिल्ड करंडक – मास्टर्स क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद
पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘स्पोर्ट्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत कर्णधार अर्णव पुरोहीत याच्या ११३ धावांच्या खेळीच्या जोरावर मास्टर्स क्रिकेट क्लब संघाने जस क्रिकेट अॅकॅडमी संघाचा ७३ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जस क्रिकेट अॅकॅडमी संघाने साखळी फेरीमध्ये सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवून आपले अपराजित्व कायम ठेवले असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. मास्टर्स क्रिकेट क्लबचा कर्णधार अर्णव पुरोहीत याने १२२ चेंडूत १४ चौकारासह नाबाद ११३ धावांची खेळी केली. यामुळे संघाने ५० षटकात ९ गडी गमावून २५८ धावांचे आव्हान उभे केले. अर्णव याच्यासह स्वयंम संतोष (४४ धावा), अनिकेत शिंदे (३९ धावा) आणि अभिग्यान कुंडू (२२ धावा) यांनी दुसर्या बाजुने धुरा संभाळली. अर्णव आणि स्वयंम यांनी सहाव्या गड्यासाठी १५८ चेंडूत १२४ धावांची भागिदारी केली.
या आव्हानाला उत्तर देताना जस क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ४६.१ षटकात १८५ धावांवर मर्यादित राहीला. जस संघाकडून परम अभ्युदया (३८ धावा), हर्षवर्धन टिंगरे (३० धावा) आणि तनिष बागने (२५ धावा) यांनी छोट्या खेळी करून संघाला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण काळे अँड सन्सचे विकास काळे आणि लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचे विनायक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या मास्टर्स क्रिकेट क्लब संघाला आणि जस क्रिकेट अॅकॅडमी संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. यावेळी स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी व अमित काळे, सहभागी संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान अर्णव पुरोहीत (मास्टर्स सीसी, १७६ धावा, ३ विकेट), सर्वोत्कृष्ट फलंदाज शिव हरपाळे (जस सीए, २०१ धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज वेदांत गोरे (मास्टर्स सीसी, १२ विकेट), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रणवीर सिंग चौहान (जस सीए) अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. लिजंड्स स्पोर्ट्स क्लब संघाला फेअर प्ले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
