सरदार पवार घराण्यातर्फे सैनिकी शाळेला प्रयोगशाळा व क्रीडा साहित्य भेट
पुणे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे लालमहाल येथे शिवज्योत प्रज्वलन व एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ मूर्तीजवळ जाऊन मानवंदना देण्यासोबतच अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रायगड व पुरंदर मधील सैनिकी शाळांना प्रयोगशाळा सामग्री, क्रीडा साहित्य व पुस्तके देऊन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, पुणे महानगर संपर्कप्रमुख राजेश पवार, स्मिता पवार, सह सहसंपर्क प्रमुख गजानन पवार, सुनील पवार, सिध्दांन्त नातू पवार , सुजित पवार, चैतन्य पवार, तुषार पवार, तुलसीराम पवार, सर्वेश पवार, प्रथमेश पवार, लव पवार, कुणाल पवार, सचिन पवार, अभिजित पवार, राजेंद्र पवार यांसह धार पवार बांधव संपूर्ण राज्यातून उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावातील सैनिक विकास माध्यमिक विद्यालय व पुरंदर तालुक्यातील नावळी येथील श्री शिवाजी इंग्लिश मिडियम स्कुल या शैक्षणिक संस्थेना प्रयोगशाळा सामग्री, क्रीडा साहित्य व पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. तसेच शिवाजी नगर येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट येथे पवार बंधूंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्ताने पाळणा देखील आयोजित करण्यात आला होता.
