यंदा रेडी रेकनर दरात वाढ नको बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संस्था क्रेडाई पुणे मेट्रोची राज्य सरकारकडे मागणी
पुणे : रेडी रेकनरच्या दरात प्रस्तावित असेलली वाढ यंदा करण्यात येवू नये अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांची एक प्रमुख संस्था असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे म्हणाले, “रिअल इस्टेट उद्योग अजूनही जागतिक महामारीच्या परिणामांतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत रेडी रेकनरच्या (आरआर) दरात वाढ करणे योग्य ठरणार नाही. मागील १८ महिन्यांत बांधकाम साहित्य दरवाढीमुळे बांधकाम खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशात रेडिरेकनरमध्ये वाढ झाल्यास किंमती वाढून घरे महाग होतील. याचा नवीन घर खरेदीवर विपरित परिणाम होऊ शकतो. याचबरोबर आमच्या ऐकण्यात आले आहे की, मेट्रो उपकरदेखील १-१.५ टक्क्यांनी पुन्हा सुरू केला जाणार आहे. याचा देखील बांधकाम क्षेत्राला फटका बसू शकतो.”
“रेडी रेकनरचे दर किमान पुढील वर्षभर तरी कायम ठेवावेत, अशी आमची राज्य सरकारला विनंती आहे. खरेतर बऱ्याच ठिकाणी रेडी रेकनरचे दर वास्तविक दरापेक्षा खूप जास्त आहेत. त्यात त्वरित सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर रेडी रेकनर दर वाढल्याने प्रीमियम आणि घरे महाग होतील. रिअल इस्टेट उद्योगातील अनेक विकसक परवडणाऱ्या घरांची रेडी रेकनरच्या खाली विक्री करीत आहेत. कोविड मदत म्हणून रेडी रेकनर किंमतीपेक्षा कमी व्यवहारांसाठी आतापर्यंत २० टक्के परवानगी देण्यात आली होती. आता ही सवलतही काढून घेण्यात आल्याने परवडणाऱ्या विभागातही घरे महागणार आहेत.”
राज्य सरकारने याविषयी आवश्यक निर्णय योग्य वेळेत घेतल्यास थेट आणि अप्रत्यक्ष रित्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या बांधकाम क्षेत्राबरोबरच घर खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकाला देखील याचा फायदा होईल असेही फरांदे म्हणाले.
