मराठमोळ्या शंकर धोत्रेना सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकाचा बहुमान
पुणे : २५ व्या ‘वर्ल्ड फिल्म कार्निवल-सिंगापूर’ या चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या शंकर धोत्रे यांना ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पोटरा’ या सिनेमासाठी धोत्रे यांना हा पुरस्कार मिळाला असून ग्रामीण भागातील मुलींची सामाजिक आणि कौटुंबिक परवड अधोरेखित करण्यात आली आहे. जागतिक सिनेमाविश्वात काम करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या चित्रपट महोत्सवात धोत्रे यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अचिवमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शंकर धोत्रे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असून ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव त्यांनी चित्रपटाद्वारे मांडले आहे. पोटरा म्हणजे ज्वारीचं अपरिपक्व कणीस. हे कणीस कापणीला जाईपर्यंत त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. किशोरवयीन मुलीचे आयुष्यही याप्रमाणेच असते. वयात आल्यानंतर मुलीला घर आणि समाजातील पोषक वातावरण न मिळाल्यास तिची होणारी घुसमट या चित्रपटात दिसते. पुरुषी मानसिकता, पूर्वापार चालत आलेल्या रुढीपरंपरा, शैक्षणिक आणि शारीरिक परवड हे मुद्दे चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न धोत्रे यांनी केला आहे.
चित्रपटाच्या कथेविषयी धोत्रे सांगतात, आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवातून अनेक विषय समोर येत असतात. माझे बालपण ग्रामीण भागात गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना दैनंदिन जीवनात करावा लागणारा संघर्ष, त्यांची होणारी घुसमट या सर्व गोष्टी प्रकर्षाने जाणवत होत्या. त्यामुळे या विषयाला व्यासपीठ मिळावे यासाठी ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी केला. चित्रपटातील मुख्य पात्र साकारणाऱ्या कलाकारांना तीन महिने मार्गदर्शन केले. हा विषय त्यांना समजावून सांगितला. चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे यांचे चित्रपट निर्मितीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. हा सामाजिक विषय चित्रपटातून मांडण्यासाठी पाठबळ मिळाले.
चित्रपटातील सर्व कलाकार ग्रामीण भागातील असून मुख्य पात्र छकुली प्रल्हाद देवकर हिने साकारले आहे. तसेच सुहास मुंडे, दीपाली कांबळे, नंदा काटे, श्रेयस हनवटे, महेश माने, उर्मिला जाधव, बाळासाहेब साठे या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारली आहे. तसेच शरद शिंगाडे (निर्माता), रणजीत माने (छायांकन निर्देशक), समीर सुमन (साऊंड डिझायनर), विनोद राजे (डिजिटल इंटरमेडिएट), मयूर बोरकर (कार्यकारी निर्माता) यांनी काम पाहिले आहे.
