वैकुंठ स्मशानभूमीच्या खाजगीकरणाला आपचा विरोध
पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना विसर्जनासाठी आता रक्षाही मिळेनात अशा तक्रारी आम आदमी पक्षाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात मयत पास यंत्रणा देखील कमी केलेली आहे. मयत पास मिळण्यास नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. यामागे वैकुंठ स्मशानभूमीचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुण्यात स्मशानभूमीचे ही टेंडर निघणार आहे का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, अशी टीका पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे. वैकुंठ स्मशानभूमीच्या खाजगीकरणाला आम आदमी पक्षाचा ठाम विरोध आहे, अशी भूमिका विजय कुंभार यांनी मांडली आहे.
भारतीय जनता पक्ष म्हणजे “सब कुछ बेच दो”, खाजगीकरण असंच समीकरण सर्वत्र बनत चाललेले आहे. पुणे महानगरपालिकेला साधी स्मशानभूमीची व्यवस्था सुद्धा स्वतःहून करता येत नसेल तर भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकीत लोकांकडे मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याकडे शहर चालवण्याची पात्रता नाही, अशी टीका आपचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसात स्मशानभूमी येथे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विसर्जनासाठी रक्षा न देता केवळ अस्थी देण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे वैकुंठ स्मशानभूमीत सुरू केलेली चोवीस तास सेवा काही दिवसातच बंद करण्यात आली होती. त्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास होत आहे. नागरिकांमध्ये खूप असंतोष आहे. ही परिस्थिती सुधारण्याऐवजी मनुष्यबळाच्या अभावाचे कारण देत मनपा सत्ताधारी आता स्मशानभूमीचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशी टीका अभिजित मोरे यांनी केली आहे.
