टीईटी परीक्षा गैरव्यवहार : 7 हजार 900 अपात्र परीक्षार्थींची यादी तयार; लवकरच होणार कारवाई
पुणे : टीईटी परीक्षा गैरव्यवहारात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. टीईटी परीक्षा गैरव्यवहारात लाखो रुपये घेवून आरोपींनी तब्बल 7 हजार 900 अपात्र परीक्षार्थींना पास केले आहे. आज पुणे सायबर पोलिसांनी या 7 हजार 900 जणांची नाव, पत्यासह यादी तयार करण्यात आली असून लवकरच या परिक्षारर्थींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले, टीईटी घोटाळा गैरव्यवाहारांचे जाळे हे दिवसंदिवस वाढतच चालले आहे. टीईटी परीक्षेत तब्बल 7900 अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे. या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये 28 मार्क असताना चक्क अंतिम निकालात 82 मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या उमेदवारांना पास करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता. विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्यांच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते.अश्या अनेक धक्कादायक बाब सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
पुणे सायबर पोलिसांनी जी 7 हजार 900 अपात्र उमेदवारांची सविस्तर यादी तयार केली आहे. ती यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेद्वारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
