Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

क्रेडाई-पुणे मेट्रो आणि ऑईस्टर अँड पर्ल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांना मोफत कोविड लस

पुणे  : बांधकाम कामगारांचे कोविडपासून रक्षण व्हावे, यासाठी क्रेडाई-पुणे मेट्रोतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. क्रेडाई- पुणे मेट्रो आणि ऑईस्टर अँड पर्ल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे पाच हजार बांधकाम कामगारांना कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाद्वारे बांधकाम कामगारांचे लसीकरण करणारे ऑईस्टर अँड पर्ल हे पहिले खासगी रुग्णालय ठरणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी ऑईस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयाच्या अधिष्ठाता, विश्वस्त व सीएमडी डॉ. अमिता फडणीस, ओएनपी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य कुलकर्णी, क्रेडाई-पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, कामगार कल्याण समितीच्या समन्वयिका सपना राठी, क्रेडाईचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का आणि कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी हे उपस्थित होते.

क्रेडाई-पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यावेळी म्हणाले, “कुठल्याही संस्थेचे यश हे केवळ नफ्यावर अवलंबून नसते. तर ती संस्था समाजाप्रती आपले ऋण कसे निभावते, सामान्यांसाठी काय योगदान देते यातून तिची वृद्धी होत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मला आशा आहे की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे बांधकाम कामगारांना मदतीचा हात देणे शक्य होणार आहे. शहरात जवळपास दीड लाख बांधकाम कामगार असून ते रिअल इस्टेट क्षेत्राचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्यासाठी हा पुढाकार आम्ही नक्कीच घेऊ शकतो.”

यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, “देशात लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनच आम्ही नागरिकांना लस देत होतो. पण ज्यांच्यापर्यंत ही सुविधा पोहोचत नाही अशा नागरिकांसाठी काम करण्याची गरज वाटत होती. क्रेडाई-पुणे मेट्रोच्या माध्यमातून हे काम करण्याचे व्यासपीठ मिळाले. बांधकाम कामगारांसाठी सेवा करण्याची संधी यामुळे आम्हाला मिळाली आहे. मजुरांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आम्ही कायम क्रेडाई-पुणे मेट्रोसोबत असू.”

“कामगार हा बांधकाम क्षेत्राचा कणा आहे. या कामगारांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वित्त, अन्न, निवारा आणि आरोग्य सेवा यासाठी काम करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असे”, कामगार कल्याण समितीच्या समन्वयिका सपना राठी म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading