Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण संस्कृतीचे संचित जपणारा ‘आठवणीच्या पारंब्या’-  डॉ श्रीपाल सबनीस

पुणे : लोकमंगल ग्रुप आणि दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित साहित्यिक डॉ राजेंद्र माने लिखित संस्कृती प्रकाशन पुणे प्रकाशित ‘ आठवणीच्या पारंब्या ‘ यालेखसंग्रहाने प्रकाशन पुणे येथे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ अरूणा ढेरे उपस्थित होत्या. ज्येष्ठ कवयित्री डॉ अश्विनी धोंगडे,सुनिताराजेपवार, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले ‘आठवणीच्या पारंब्या ‘ हा लेखसंग्रह म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे सात्विक संचित आहे. जात, पात, धर्मापलिकडे जाऊन माणुसकीचे अस्सल दर्शन यात होते. सगळा भोवताल बदलत आहे, सांस्कृतिक पतन दिसत आहे अशा वेळी या लेखसंग्रहातून व्यक्त झालेले निसर्ग, माणूस,सण -परंपरा, प्राणी, जत्रा या सर्व विषयाचे चिंतन एक दस्तऐवज स्वरूपाचे आहे. यातले समाजभान माणसातली माणूसकी जागे करणारे आहे. सध्याच्या भ्रष्ट भोवतालात आता सात्विक संस्कृतीची पालखी वहाण्याचे काम लेखकानी करायचे आहे.यावेळी डॉ अरुणा ढेरे म्हणाल्या ‘ जुना काळ माणसाच्या हातातून फुलपाखरासारखा उडून जातो पण मुठीत काहीसा सुगंध ठेवून जातो. डॉ माने यानी या पुस्तकातुन पुन्हा ग्रामीण भागातला भोवताल जिवंत ठेवला आहे.जी काळाची गरज आहे.डॉ अश्विनी धोंगडे म्हणाल्या ‘ या पुस्तकातील लेखातून येणारी सातारा सांगली भागातील बोली अस्सल आहे. त्या भाषेतली लय , गोडवा आठवणीच्या पारंब्यामधून जाणवतो. यातली माणसेलेख वाचताना डोळ्यासमोर साकार होतात. जवळची वाटतात. लोप पाहू जाणारी ग्राम्य संस्कृती, प्रतिके या पुस्तकातून जिवंत राहतील.शिरीष चिटणीस म्हणाले ‘ जे लोक ग्रामीण भागातील आयुष्य काही काळ का होईना जगले आहेत त्यांना यातले लेख जवळचे वाटतील. त्यातला ओलावा त्यांना जाणवेल. ‘सुनिताराजे पवार म्हणाल्या ‘ या लेखसंग्रहातील लेखातून पुन्हा जवळची माणसे, देवळे, बाजार, ग्रामीण राजकारण भेटल्याची अनुभूती येते. लेखनातली सकसता आणि सजगता प्रकाशकाला भूल घालते. त्यामुळे अशी पुस्तके प्रकाशित करण्यात जास्त आनंद मिळतो. ‘यावेळी या पुस्तकाचे लेखक डॉ राजेंद्र माने म्हणाले ‘ आयुष्यातला ग्रामीण भागात घालवलेला काळ मनाला समृद्ध करणारा ठरला. यातले लेख लिहिताना पुन्हा बालपण जगल्याचा आनंद मिळाला.द्दष्टीच्या चौथऱ्यावर पुन्हा जुना भोवताल जिवंत झाला

प्रा. मिलिंद जोशी, मनोहर सोनावणे, राजीव बर्वे, लक्ष्मीकांत रांजणे, स्नेहसुधा कुलकर्णी, माधव राजगुरु, राजन लाखे , विश्वास वसेकर,आरती देगावकर, मिलिंद ढेरे, स्नेहल दामले, संजय ऐलवाड, संदीप तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर यानी केले.

Leave a Reply