मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 79 होते. त्यांच्यावर निगडी स्मशानभूमी येथे 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, दोन मुले सूरज, धीरज, पत्नी, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाबर मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई येथील होते. पिंपरी- चिंचवड शहरात ते स्थायिक झाले होते. रेशन फेडरेशनचे अध्यक्ष होते. काळभोर भागातून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे बाबर यांनी सलग दोनवेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये नव्याने निर्मिती झाली. शिवसेनेने बाबर यांना उमेदवारी दिली होती. बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला.
2014 मध्ये लोकसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बाबर यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला होता. बाबर यांची मोठी राजकीय कारकीर्द होती. मागील दीड महिन्यापासून बाबर आजारी होते. दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
