वाईन धोरण म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाखाली लबाडी – रंगा राचुरे
पुणे : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न करायची गरज आहे. परंतु अधिक व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा देणारी धोरणे राबवण्याऐवजी अचानक शेतकऱ्यांच्या नावे वाईन उद्योगाला सुपर मार्केट चे नवे विक्री क्षेत्र खुले करण्याचे महाविकास आघाडीचे धोरण अनाकलनीय आहे.
देशातील सर्वाधिक वाइनरी उद्योग महाराष्ट्रात आणि त्याही मुख्यत्वे नाशिक भागात आहेत. हा उद्योग फारसा फायदेशीर नाही हे खरे आहे. परंतु भारतात या वाईनची बाजारपेठ मर्यादित आहे व त्याचा संबंध सांस्कृतिक मानसिकतेशी आहे. बार संस्कृती मध्ये , पार्टी संस्कृती मध्ये वाईनहे पेय इतर अल्कोहोल युक्त मद्यपान करणाऱ्या सोबतीने घेतले जाते. त्यामुळे वाईनपेयपान संस्कृती राबवताना, प्रोत्छाहन देताना मद्यपान संस्कृतीला आपोआप मान्यता मिळते हे वास्तव दृष्टीआड करून चालणार नाही.
वाईनवरचा कर केवळ लिटर मागे १० रुपये असून राज्याचा खप अंदाजे ७० लाख लिटर म्हणजे ५ ते ७ कोटीचे उत्पन्न आहे. त्यामुळे उत्पन्न वाढते हा मुद्दा खरा नाही. दुसरीकडे परदेशी आयात लिकर वरील आयात कर कमी केला गेला आहे. जिथे महिलांनी दारूबंदी मागितली तिथली दारूबंदी उठवण्यात सरकारला अधिक रस आहे. या सर्वात कुटुंबातील अत्याचार, ताण आणि दारिद्र्य वाढत जाते असा महिला संघटनांचा अनुभव असताना सरकारचे धोरण काय आहे असा प्रश्न उभा राहतो आहे.
त्यामुळे या सर्वात काही हितसंबंध असावेत वा दिशाहीन धोरणाचा हा परिणाम असावा. शेतकऱ्यांचे हित साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना त्यांचे नावे लबाडी करीत कौटुंबिक अस्वास्थ्य वाढवणाऱ्या संस्कृतीला बाजार खुला करण्याच्या धोरणाचा आम आदमी पार्टी निषेध करते असे आप राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे.
