fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

विद्यापीठातर्फे २०२२ चा सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे देण्यात येणारा २०२२ चा सावित्रीबाई फुले सन्मान यंदा लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, लता करे, पद्मश्री डॉ. कल्पना सरोज, बागेश्री मंठाळकर, पूजा कदम आणि गोदावरी मुंडे या विविध क्षेत्रात आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आला.

कोव्हिड च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन स्वरूपात मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात हा सोहळा बुधवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्या तथा सन्मान शोध समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाच्या ‘विद्या विकास’ आणि ‘स्वररंग’ या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

भारतीय सैन्यदलात आपल्या कामाचा ठसा उमटवत महाराष्ट्रातील पहिली महिला लेफ्टनंट होण्याचा मान मिळवलेल्या व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, आपल्या पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या लता करे, महाविद्यालयीन दशेपासून विद्यार्थी, वंचित घटकांसाठी लढणाऱ्या बागेश्री मंठाळकर, दृष्टीदोषावर मात करीत आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाणारी पूजा कदम, उद्योग क्षेत्रात जम बसवत अनेकांना रोजगार मिळवून देणाऱ्या पद्मश्री डॉ. कल्पना सरोज आणि भजन, अभंग गात अध्यात्मिक मार्गाने समाजप्रबोधन करणाऱ्या गोदावरी मुंडे या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी गौरवमुर्तीं महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा विकास हा केवळ शैक्षणिकदृष्ट्या नाही तर एक माणूस म्हणून व्हावा यासाठी समाजात जे चांगलं घडतंय त्याची त्यांना माहिती करून देणे विद्यापीठाचे काम आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो, त्यांना लढण्याची प्रेरणा मिळते व समाजाशी त्यांची नाळ जोडली जाते.

यावेळी राजेश पांडे म्हणाले, सावित्रीबाईंच्या जन्मदिवशी हा पुरस्कार देण्यात येतो, कोव्हिडमुळे यंदा थोडा उशीर झाला. मात्र या कार्यक्रमामागील हेतू हा आहे की, समाजात जे चांगलं घडतंय त्याचं प्रतिबिंब विद्यापीठात उमटावं. विद्यापीठाने आजवर अनेक छोट्या छोट्या प्रयोगातून उपक्रमशीलता जोपासली आहे. या सर्व गोष्टीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व स्वतःच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीत आपलं योगदान द्यावं.
गौरवमुर्तींच्या निवड समितीतील सदस्य डॉ. माधवी रेड्डी व डॉ. शुभदा घोलप आदीही यावेळी उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. संतोष परचुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. शेकडो विद्यर्थ्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली होती.


मी स्वतःला कधीच स्त्री पुरुष या चौकटीतून पाहिले नाही. आजच्या मुलींनीही हाच विचार घेऊन पुढे जावे. सावित्रीबाईंच्या कार्यात महात्मा फुले यांचे पाठबळ होते. तसेच ज्यावेळी महिलांच्या मागे पुरुष उभे राहतात तेव्हा अशा पुरुषांचाही समाजाला पुढे नेण्यात वाटा असतो.

  • लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading