Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

लसीकरणाची वर्षपूर्ति : ही मोदी सरकारची अभिनंदनीय कामगिरी

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस काल एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ मिळाले असून जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत असल्याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले. एका बाजूला सर्वाधिक सुरक्षा उपायाचा अवलंब करतानाही जनजीवर पूर्वपदावर येण्याकरिता केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र मात्र पुन्हा सर्व व्यवहार बंद करून राज्याला अस्थिरतेकडे नेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

गेल्या वर्षी, १६ जानेवारी २०२१ रोजी, मनीष कुमार नावाच्या ३४ वर्षांच्या सफाई कर्मचाऱ्यास कोविडविरोधी लसीची पहिली मात्रा देऊन या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. १४ जानेवारी २०२२ रोजी या मोहिमेअंतर्गत लसीकरणाच्या १५६ कोटी मात्रा पूर्ण झाल्या असून, ९३ टक्के जनतेचे पहिल्या मात्रेचे तर ७० टक्के जनतेचे दोनही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तेलंगणा, गोवा, सिक्कीम, दादरा-नगरहवेली, दीव-दमण, लडाख, लक्षद्वीप येथे पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून मोहिमेच्या पहिल्या ७८ दिवसांतच भारताने १०० कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करून जागतिक स्तराव मोठी आघाडी नोंदविली आहे. लसीकरण संख्येच्या हिशेबात पाहता, भारताने इंग्लंडच्या लसीकरणाच्या २३ पट, जर्मनीच्या १९ पट, फ्रान्सच्या २३ पट, ब्राझीलच्या आठ पट, जपानच्या १२ पट, इटलीच्या २६ पट, स्पेनच्या ३३ पट, तर कोरियाच्या ३० पटीने अधिक लसीकरण विक्रमी वेळात पूर्ण केले, अशी माहिती त्यांनी दिली.

याच काळात भारतातील राजकीय नेते मात्र, अपयशाचे खापर मोदी सरकारवर फोडण्याचा अपयशी प्रयत्न करत होते, व अपप्रचारात मग्न होते अशी टीकाही मुळीक यांनी कोणाचेही नाव न घेता केली. लसीकरणाबाबद जनतेत संभ्रम माजविण्याचे प्रयत्नही काही नेत्यांनी केले, पण भारतीय जनतेने मोदी सरकारवर दाखविलेल्या विश्वासामुळे असे नेते तोंडघशी पडले, असा टोलाही त्यांनी हाणला. कोविडशी झुंजत देश झपाट्याने पुढे जात असताना महाराष्ट्र सरकार मात्र, शिक्षणव्यवस्थेस टाळे लावून अनेक नवे निर्बंध लादत राज्याला मागे नेत आहे, अशी खंतही मुळीक यांनी व्यक्त केली.

Leave a Reply