डॉ अनिरुद्ध जोशी यांच्या नाडी-संगणकीय उपकरणास केंद्र सरकारचे ‘स्टार्टअप अवॉर्ड’

पुणे : भारतीय औद्योगिक विश्र्वात नाविन्यपूर्ण संशोधन व विकास करणार्‍या तरुण संशोधकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्टार्ट-अप इंडिया अवॉर्ड’पुण्यातील नाडितरंगिणीचे निर्माते डॉ अनिरुद्ध जोशी यांना जाहीर झाले आहे. त्यासाठी भारतातून 2177 अर्ज आले होते. त्यातील 46 जणांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इ.सन 2016 मध्ये ही योजना सुरू केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. एकविसाव्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणार्‍या आणि जगभर उपयोगी पडू शकणार्‍या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू केली. त्यात प्रामुख्यांने तरुणांच्या अडचणी सोडविण्यावर भर असे. इ.सन 2020 पासून आघाडीच्या संशोधकांना व उद्योजकांना वार्षिक सन्मान सुरू करण्यात आले. हे सन्मानाचे दुसरे वर्ष आहे. हे सन्मान केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्रालयाकडून जाहीर केले जातात. कोरोना महामारीमुळे सर्व सन्मानप्राप्त संशोधकांना दिल्लीत न बोलावता आज दिल्लीत हे प्रातिनिधिक स्वरूपात हे सन्मान देण्यात आले. त्याचे वृत्त केंद्र सरकारच्या प्रेस इंफरमेशन ब्युरोने जाहीर केले आहे.

डॉ अनिरुद्ध जोशी यांच्या नाडी तरंगिणीचे वैशिष्ठ्य असे की, भारतातील प्राचीन आयुर्वेदातील ‘मनगटावरील नाडी तपासून शरिरातील रोगाचे निदान करणे व उपाय सुचवणे हे काम त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने संगणकावर व मोबाईलवरही बसविले. त्यांचे ‘स्टार्टअप इंडिया’ सन्मान मिळालेले ‘तुरीय’ नावाच्या उपकरणाच्या आधारे स्वत:ची प्रकृती रोजच्या रोज नीट कशी ठेवायची, यांच्या सूचना मिळतात. डॉ जोशींनी तयार केलेली ही उपकरणे सध्या बारा देशात काम करत आहेत व त्याच्या आधारे एक लाख लोकांची शरीर व आरोग्य तपासणी केल्याची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरुपात आहे.


Leave a Reply

%d bloggers like this: