Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार

पुणे : शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला 200 बेड कार्यान्वित होणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचा चांगला उपयोग झाला. दुसऱ्या लाटेवेळी महापालिकेने 23 मार्च 2021 पासून जम्बो पुन्हा सुरू केले. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने 22 जूनपासून जम्बो बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी 22 जूनपर्यंत 25 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील अत्यवस्थ वगळता इतर रुग्ण अन्य ठिकाणी शिफ्ट केले. त्यानंतर 30 जून 2021 रोजी हे सेंटर बंद करण्यात आले. आता रुग्णसंख्या आणि सक्रिय बाधितांची संख्या वाढल्याने जम्बो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्बो कोविड सेंटरमधील बेडची क्षमता सुमारे 800 असून, त्यात 700 ऑक्‍सिजन बेड आहेत. मात्र, सध्या 200 बेड कार्यान्वित करण्यात येणार असून, यामध्ये 120 ऑक्‍सिजन बेड, तर 20 व्हेंटिलेटर बेड असणार आहेत. असे भारती यांनी सांगितले आहे.

जम्बोचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे लागणार
दुसरी लाट ओसरल्याने 30 जून 2021 रोजी जम्बो बंद करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलचे हे स्ट्रक्‍चर जवळपास सव्वा वर्षांपूर्वीचे असल्याने ते पुन्हा वापरायचे असल्याने त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, 15 जुलैपर्यंत हे ऑडिट करण्याची विनंती पालिकेने ‘आयआयटी’ दिल्लीला केली होती. त्यानुसार हे ऑडिट पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल नुकताच पालिकेस प्राप्त झाला आहे. त्यानुसार, 12 जानेवारी 2022 पर्यंत हे स्ट्रक्‍चर वापरण्यासाठी सुयोग्य असून, त्याला कोणताही धोका नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता ती मुदत संपत आल्याने तिसऱ्या लाटेसाठी जम्बोचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे लागणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading