सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली – प्रशांत जगताप
पुणे : वात्सल्यमूर्ती माई सिंधुताई सपकाळ यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे. स्वतःच्या जीवनातील असंख्य दुःखे विसरून इतरांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी प्रचंड निस्वार्थी वृत्ती व दुर्दम्य इच्छाशक्ती यांचा मेळ आपल्या अंगी असावा लागतो. माईंनी असंख्य अनाथ बालकांना आईची माया दिली, त्यांना स्वतःच्या पायांवर उभं केलं. माईंचं संपूर्ण जीवन म्हणजे सेवेचा, त्यागाचा आणि समर्पणाचा अध्याय आहे.

माईंच्या संस्थेच्या माध्यमातून मला अनाथ बालकांसाठी काम करण्याची संधी मिळाली, या निमित्ताने माईंचा प्रदीर्घ सहवास मला लाभला हे मी माझे परमभाग्य समजतो. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांसाठी माईंचे संपूर्ण जीवनचरित्र दिशादर्शक आहे. माईंनी आपल्या सर्वांना सेवामार्ग दाखवला, त्या सेवामार्गावर चालणे हीच आपल्या वतीने त्यांना उचित आदरांजली ठरेल. असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काढले आहेत. वात्सल्यमूर्ती सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
