स्टारविन्स ग्रुपतर्फे ३१ डिसेंबर पर्यंत तीन प्रदर्शनांचे आयोजन
पुणे : स्टारविन्स ग्रुपतर्फे २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान क्षण छायाचित्र प्रदर्शन, कलाधिपती छायाचित्र प्रदर्शनासह पॅलेट चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही प्रदर्शनांचे उदघाटन स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या हस्ते रविवारी (दि.26) सकाळी अकरा वाजता होणार आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना क्षण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अभिनेते गिरीश परदेशी, वंदे मातरम संघटनेचे आकाश गजमल,लेखक शरद तांदळे, खेळाडू हेरंब चव्हाण आणि उद्योजक विजय रायकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर आणि राज लोखंडे यांनी दिली.
बालगंधर्व कलादालनात सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत तिन्ही प्रदर्शने होणार आहेत. २६ ते २८ डिसेंबर क्षण छायाचित्र प्रदर्शन, २८ ते २९ डिसेंबर कलाधिपती प्रदर्शन आणि ३९ ते ३१ डिसेंबरला पॅलेट चित्र प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनांचे हे सहावे वर्ष असून, क्षण आणि कलाधिपती या छायाचित्र प्रदर्शनांमध्ये देशविदेशातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. या दोन्ही छायाचित्र प्रदर्शनात देशविदेशातील ५० छायाचित्रकारांची विविध विषयांवरील २०० छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत.
क्षण छायाचित्र प्रदर्शनात स्ट्रीट छायाचित्रणासह विविध विषयावरील छायाचित्रे पाहता येतील. तर कलाधिपती प्रदर्शनात गणेशोत्सवापूर्वीची आणि उत्सवानंतरची छायाचित्रे पाहायला मिळतील. त्यात श्रीगणेशाची विविध रुपेही पाहता येईल. याशिवाय पॅलेट चित्र प्रदर्शनात २० चित्रकारांची विविध विषयांवरील ५० देखणी चित्रे पाहावयास मिळणार आहेत. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत सर्वांसाठी पाहावयास खुले राहील.
