Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

आता वैकुंठ स्मशानभूमीत २४ तास मयत पास सुविधा 

पुणे : महानगरपालिकेतर्फे वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांसाठी २४ तास मयत पास सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाससाठी खोळंबून राहण्याची गरज पडणार नाही. महापालिकेच्या हद्दीत निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मयत पास घेणे आवश्‍यक असते. या पासद्वारेच पुढे मृत्यू दाखला काढता येतो. सध्या शहरातील ४६ ओपीडीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ आणि १८ प्रसुतीगृहात २४ तास मयत पास देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयात मयत पास केंद्र होते. पण त्या ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हे केंद्र १५ दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. सर्वाधिक अंत्यविधी हे वैकुंठ स्मशानभूमीत होतात, तेथे पास घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या एका वर्षामध्ये वैकुंठ स्मशानभूमीतून ४ हजार ६०४ जणांचे मयत पास दिले गेले. हे ठिकाण नागरिकांच्या सोईचे असल्याने वैकुंठमध्ये १२ तासांऐवजी २४ मयत पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या, ‘‘वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना २४ तास मयत पास मिळेल. त्यासाठी तीन शिफ्टमध्ये तेथे कर्मचारी कार्यरत असतील. वैकुंठ मधून पास येण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही वेळ वाढविण्यात आली आहे.’

Leave a Reply