पुणे महानगरपालिकेला 99 लाखांचा गंडा घालणाऱ्याला भामटयाला अटक
पुणे : विद्युत विषयक कामे करून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून 99 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश उर्फ योगी चंद्रशेखर मोरे (वय 34 रा.गणेश पार्क, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर, नवी पेठ आणि कोथरूड येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत विद्युत विषयक कामे केल्याचे दाखवून त्याबाबतचे 99 लाख आठ हजार रुपयांचे बनावट बिले तयार केली. खरी बिले असल्याचे भासवण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण फॉर्म बिल तयार करून त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बनावट सह्या आणि शिक्के मारले. या बिलाचे परस्पर कार्यालयीन जावक करून आरोग्य विभागाकडे ही बिले पाठवले.
हा प्रकार समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मोरे यांनी बनावट बिले सादर करून ती मंजूर करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रल्हाद पवार यांनी तक्रार दिली.पुणे महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
