Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

ब्रशच्या टोकाला स्पर्श जाणवला पाहिजे चित्रकाराने एवढं संवेदनशील व्हावे – ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचे मत

पुणे : मानवाने आज मोठी प्रगती करत विकासाचा वेग वाढवला आहे, मात्र निसर्गाच्या बदलाचा वेग कायम आहे. प्रगती होत असताना कोणत्या अंगाने अधोगती होत आहे? हे समजून घेतले पाहिजे. मनुष्याला कौशल्याचे आणि कुशलतेचे कायम आकर्षण राहिले आहे, ब्रशच्या टोकाला स्पर्श जाणवला पाहिजे चित्रकाराने एवढं संवेदनशील व्हावे असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा “चित्र-शिल्प संवाद” हा एक आगळा वेगळा बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू आहे. 12 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार्‍या या उपक्रमाच्या दुसर्‍या दिवशी प्रात्याक्षिक सादर करताना वासुदेव कामात बोलत होते. याप्रसंगी आयोजक ‘दीवा प्रतिष्ठान’चे संस्थापक दिपकभाऊ मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, शिल्पकार विवेक खटावकर, बापूसाहेब झांजे, दत्ता सागरे आदी मान्यवर उपस्थित होते. वासुदेव कामात यांनी यावेळी सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांचे पोट्रेट रेखाटत पुणेकरांशी संवाद साधला.

पुढे बोलताना वासुदेव कामत म्हणाले, ऐतिहासिक, पौराणिक किंवा रियलस्टिक असे कोणत्याही प्रकारचे चित्र काढताना विशिष्ट कार्यपद्धती तोडलीच पाहिजे असे नव्हे, विशिष्ट शैलीत काम केले म्हणजे कमीपणा हा समज चुकीचा आहे. चित्रकला, शिल्पकला यांच्याकडे केवळ शैक्षणिक दृष्टीकोन बघू नये यामुळे कलाक्षेत्राची दिशाभूल होत आहे. कला महाविद्यालयात विद्यार्थी आले की त्यांना काय करा हे सांगण्यापेक्षा काय करू नका असे सांगितले जाते आणि एका अर्थाने ही महाविद्यालयेच एकलव्यची बोटे छाटत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कलाक्षेत्रातील विसंवादावर भाष्य करताना कामत म्हणाले, देशातील आज प्रसिद्ध असलेल्या अनेक कलाकृती निर्माण करण्यासाठी दोन – तीन पिढ्या एकत्र राबल्या आहेत, मात्र आज एका कॅनव्हासवर दोन चित्रकार एकत्र येत नाहीत, कधी एखादा ग्रुप एकत्र आला तर त्यांच्यात दोन प्रदर्शनापेक्षा जास्त एकी टिकत नाही. कलेच्या विकासाबाबत आपण राज्यकर्त्यांना सतत दोष देत त्यांच्याकडे बोट दाखवत असतो, मात्र आपण आत्मपरिक्षण करायला हवे, मतभेद असले तरी कुठेतरी एकमत होणे गरजेचे असते.

कितीही आधुनिकीकरण झाले तरी व्यक्तीला आपला आपल्याला परिचय करून घेण्याची आवश्यकता असते, यात कुठेही खंड पडलेला नाही, यामुळे शिल्पकला आणि चित्रकलेत व्यक्तिचित्रण कला महत्वाची असल्याचे सांगत कामत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दीपक मानकर म्हणाले, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सरांनी आज ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांचे पोट्रेट रेखाटले यामुळे खर्‍या अर्थाने चित्र-शिल्प संवाद झाला आहे. आज बालगंधर्वांच्या नावाने असलेल्या या वास्तूत प्रत्यक्ष वासुदेवाने भवगवंताचे चित्र रेखाटले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
‘चित्र-शिल्प संवाद’च्या दुपारच्या सत्रात शिल्पकार सुप्रिया शिंदे आणि चित्रकार मंजिरी मोरे यांनी आपल्या कलेचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading