Saturday, October 31, 2026
BusinessLatest News

प्राजच्या ‘बायोसिरप’ तंत्रज्ञानाने घेता येणार इथेनॉलचे वर्षभर उत्पादन; साखर उद्योगास मिळणार नवी उभारी

पुणे : गळीत हंगामामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ऊसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून पुढे वर्षभर इथेनॉल उत्पादन करता येऊ शकेल असे ‘बायोसिरप’ तयार करण्याचे नवतंत्रज्ञान पुणेस्थित प्राज या बायोटेक कंपनीने नुकतेच विकसित केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्राजचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी याबाबतची अधिकृत घोषण केली. 

प्राजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिशीर जोशीपुरा, जैव उर्जा विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे उपाध्यक्ष डॉ रवींद्र उटगीकार आदी या वेळी उपस्थित होते. 
ऊसाचा रस हा नाशवंत पदार्थ असून तो चोवीस तासांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर ऊसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याचे सिरपमध्ये (पाकामध्ये) रुपांतर करण्याचे स्वतःचे (स्वामित्वहक्क असलेले) नवतंत्रज्ञान प्राजने विकसित केले आहे. हे सिरप साधारणपणे बारा महिन्यांपर्यंत टिकते. त्यामुळे ऊसाचा हंगाम संपल्यानंतरही साखर कारखान्यांना हे सिरप (पाक) वापरून पुढचे वर्षभर इथेनॉलचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. यातून इथेनॉलचे उत्पादन तर वाढेलच शिवाय कारखान्यांना अतिरिक्त महसूल मिळून ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतील.

कराड (जि. सातारा) जवळील जयवंत शुगर्स येथे दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात वरील बायोसिरप तंत्रज्ञानाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी त्याचे यशस्वी प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविण्यात आले. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ओपरेटीव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष आणि साखर संघ मुंबईचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

मागणी व पुरवठा यांच्यातील तफावतीमुळे / उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखर क्षेत्राला अतिरिक्त / शिल्लक साखरेचा प्रश्न भेडसावत आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांना केवळ हंगाम सुरु असेपर्यंतच इथेनॉलचे उत्पादन करणे शक्य होत असे. अतिरिक्त साखरेचे उत्पादन रोखण्यासाठी राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८ अंतर्गत केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे.

बायोसिरप तंत्रज्ञान वापरून व्यावसायिक स्तरावरील इथेनॉल उत्पादन करण्याचा पथदर्शी प्रकल्प नुकताच जयवंत शुगर्स येथे कार्यान्वित करण्यात आला. गेल्या वर्षभर साठवून ठेवलेल्या साखरेच्या पाकातून शर्कराघटक अजिबात कमी होत नसल्याचेही सिद्ध झाले आहे. साखर क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या भारतातील अग्रगण्य अशा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने देखील प्राजच्या बायोसिरप तंत्रज्ञानावर मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

उपरोक्त उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी बोलताना शेखर गायकवाड म्हणाले, सध्या साखरेचा ६ मिलियन मेट्रिक टन इतका अतिरिक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे बरेचसे पैसे अडकून पडले आहेत / पुढील १२ ते २४ महिन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ऊसाच्या रसापासून बायोसिरप व त्यापासून इथेनॉल निर्मिती हाच खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्याचा दीर्घकालीन शाश्वत मार्ग साखर कारखान्यांपुढे असल्याचे प्रतिपादन श्री. गायकवाड यांनी केले. बायोसिरप ही एक मोठी उपलब्धी असून देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील साखर क्षेत्रामध्ये अभिनव बदल घडवून आणण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे, असे मत व्यक्त करीत श्री. गायकवाड यांनी या यशाबद्दल प्राज परिवाराचे अभिनंदन केले.

प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी या महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या सफलतेबद्दल समाधान व्यक्त करताना म्हणाले की, साखरेचे आवश्यकतेपेक्षा अधिक उत्पादन झाल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी घटना आहे. साखर कारखान्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला तर मिळेलच शिवाय त्यांची आर्थिक कामगिरी देखील या तंत्रज्ञानामुळे सुधारेल, असे मत डॉ. चौधरी यांनी व्यक्त केले. इंधनामध्ये २०% इथेनॉल मिसळण्याच्या ध्येयपूर्तीसाठी, ‘कुठेही, केव्हाही इथेनॉल’ या उक्तीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी देशभरात इथेनॉल निर्मिती वाढवण्याकामी वाहतूकदृष्ट्या सुलभ असे बायोसिरप अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल, असेही ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि शेतकरीवर्गाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी नवनवीन तंत्रज्ञाने विकसित करून यशस्वीपणे कार्यान्वित होणे, ही  प्राजच्या दृष्टीने विशेष अभिमानाची गोष्ट असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. बायोसिरप यशस्वी करण्यामध्ये साखर आयुक्त, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर संघ मुंबई, जयवंत शुगर्स यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि सहकार्याबद्दल प्राजतर्फे मी त्यांना खूप धन्यवाद देतो; प्राजच्या जगभरातील ग्राहकांकाढून या तंत्रज्ञानाबद्दल विचारणा होत असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.

मागील आठवड्यात ‘बायोसिरप’चे औपचारिक उद्घाटन झाल्यापासून त्याविषयी साखरक्षेत्रातच नव्हे तर भारतातील बिगर-साखर उत्पादक राज्यांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत असून भारताच्या एकंदर इथेनॉल उद्योगाच्या विस्तारामध्ये या तंत्रज्ञानाकडे एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply