Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

नव्वदीतही अरण्यऋषींचा वृक्षकोश लिहीण्याचा निर्धार

पुणे : माझे सगळे आयुष्य विदर्भाच्या जंगलांमध्ये गेले. जंगलात फिरताना पक्ष्यांची निरीक्षणे करून टिपून ठेवायचो. यादरम्यान काही हुशार आदिवासी भेटले, त्यांनी त्यांची भाषा मला शिकविली. त्या भाषेच्या माध्यमातून देखील आपल्याला माहीत नसलेल्या जंगलातील अनेक गोष्टी कळल्या. त्यानंतर पक्षी कोश आणि प्राणी कोश लिहून काढला. त्यानंतर दहा वर्षे कोकणात राहून मच्छी कोश लिहिला. महाभारत आणि रामायणात अनेक वृक्षांचा उल्लेख केला आहे. त्यावरून आता वृक्ष कोश लिहीत आहे. महाभारताच्या 21 खंडांचा सध्या अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वयाने थकलोय तरीही काम करत राहणार असल्याची आशा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. संस्थेच्या स्थापनेस १५१ वर्षे पूर्ण होत आहे. या १५१ व्या वार्षिक उत्सवात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ झाला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांना आणि डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कार पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन या संस्थेला देण्यात आला. यावेळी पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे राजेश शाह, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग उपस्थित होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारांमध्ये मिळालेले 25 हजार रुपये मिलिंद भोई यांनी भोई प्रतिष्ठानच्या अर्धापूर जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले.

मारूती चितमपल्ली म्हणाले, चकोर पक्षाची माहिती संस्कृत साहित्यात मिळते. चकोर आपल्या पिल्लांना घेऊन चंद्र प्रकाशात येते आणि चंद्रप्रकाश वेचते असे म्हटले जाते. यामागील तथ्य जाणून घेण्यासाठी शिमल्याला जाऊन मी पाहणी केली. तर चकोर पक्षी हि तिच्या पिल्लांना चंद्रप्रकाशात नेऊन तेथील वाळवी ते खातात, यामुळे त्यांची वाढ लवकर होते आणि शत्रूंपासून संरक्षण करता येते, हे तथ्य त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच सुरेल गाणाऱ्या गायिकेला गानकोकिळा म्हटले जाते, परंतु नर कोकिळ गात असतो मादी कोकिळा कधीच गात नाही त्यामुळे गानकोकिळा म्हणणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

जयंत उमराणीकर म्हणाले, धर्माच्या पुढे ही एक शक्ती असते. ही अद्वितीय शक्ती जगातील प्रत्येक ठिकाणी आहे. त्याच्याशी आपण जोडून घ्यायला हवे. आपल्या देशात जी प्रार्थना, उपासना केली जाते तशी पद्धत जगात दुसरीकडे कुठेही नाही. ध्यानाची पद्धती आपण जगाला दिली आहे, यामध्ये प्रचंड ताकद आहे. आपण प्रार्थना कशी करायची ते ठरवून त्यातून स्वत:ची प्रगती करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. दिलीप जोग म्हणाले, भारताची प्रगती हवी असेल तर प्रत्येक माणसाची आत्मोन्नती व्हायला हवी. यातूनच जगाची देखील प्रगती होईल. त्यासाठी प्रार्थना, उपासना करायला हवी. हेच काम प्रार्थना समाजाच्या माध्यमातून होत आहे. दत्तात्रय लाटे यांनी सूत्रसंचालन केले.  डॉ. सुषमा जोग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading