विद्यार्थी व प्राध्यापकांच्या जल्लोषाने विद्यापीठ पुन्हा दुमदुमले..!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
पुणे : कोव्हिड महामारीमुळे जवळपास दीड ते पावणेदोन वर्ष बंदिस्त झालेला उत्साह, जल्लोष आणि पुनरारंभाचा आनंद विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये पाहायला मिळाला. निमित्त होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या इंद्रधनुष्य, राज्यस्तरीय युवक महोत्सव यांसह अन्य स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे..!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाद्वारे महाविद्यालयीन व विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थी संघ वेगवेगळ्या स्पर्धांसाठी युवक महोत्सवासाठी पाठविले जातात. इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सव, पश्चिम विभागीय युवक महोत्सव अशा युवक महोत्सवातील विजेत्यांचा व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सहभागी विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या वतीने गौरव करण्यात येतो. यंदा कोव्हिडचे निर्बंध कमी झाल्यानंतर या परितोषिकांचे वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे, डॉ. विलास उगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोव्हिड काळात निर्बंध असले तरीही विद्यापीठाचे काम थांबले नाही. विद्यापीठाने अनेक सामाजिक कार्य करण्याबरोबर ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले तर परीक्षाही ऑनलाइन घेतल्या. आज पुन्हा एकदा इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वजण एकत्र आल्याने आम्हा सर्वांचाही उत्साह वाढला आहे.
डॉ. एन.एस.उमराणी म्हणाले, विद्यापीठ कोव्हिड काळातही कायम अग्रेसर राहिले आहे. बहुविद्याशाखीय पध्दती सर्वात आधी स्वीकारणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे, याचा मला अभिमान आहे.
राजेश पांडे म्हणाले, विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत असतानाच संधी मिळाली तर त्यांना भविष्यात त्याचा फायदा होतो. ही संधी देण्याचं काम हे आम्ही विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून करत असतो. या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आम्ही मंडळातर्फे ७५ विविध कार्यक्रम राबविणार आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.
