श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवानिमित्त सजले कसब्यातील अतिप्राचीन मंदिर

पुणे : स्थापित देवतांचे आवाहन, देवता पूजन आणि दीपप्रज्वलनाने कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवानिमित्त विद्युतरोषणाई, फुलांची आरास व पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर सजविण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भैरव मंत्रजप, दुर्गापाठ, सायंपूजन, आरती उत्सवाच्या पहिल्या दिवशी झाली. स्थापित देवतांचे पूजन, भैरव मंत्रजप, दुर्गापाठ, सायं पूजन व आरती असे दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव सुरु आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: