उच्च न्यायालयाचा वानखेडे यांना दिलासा नाही

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे कुटुंबियांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांना रोखण्यासाठी न्यायालयात धावा घेतली होती. मात्र वानखेडे यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडेंना कोणताही दिलासा दिला नसून, नवाब मलिकांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

 मलिक यांनी अनेक पोस्ट शेअर करत पुराव्यासह वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यामुळे वानखेडे कुटुंबांने मलिकांना रोखण्यासाठी कोर्टात धावा घेतली होती. आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे सांगत ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना आरोप करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे. तसेच नवाब मलिकांनी केलेली वक्तव्यं ही योग्य पद्धतीनं तपासून केलेली नाही असे सांगत न्यायालयाने मलिकांनी भविष्यात या गोष्टीची काळजी घेण्यात यावी असे सांगितले आहे. तसेच नवाब मलिकांनी दोन आठवड्यांत हायकोर्टात प्रतिउत्तर सादर करावे असेही निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक सध्या दुबईला गेलेले आहेत. मात्र राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी न्यायालयाच्या या निर्देशानंतर सत्यमेव जयते असे ट्वीट केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: