कचरा टाकणा-यांच्या विरोधात वृक्षारोपण करुन कार्यकर्त्यांची गांधीगिरी

पुणे : चला संकल्प करुया पर्यावरण रक्षणाचा, झाडे लावून पृथ्वीचे आयुष्य वाढविण्याचा… असा संदेश देत नारायण पेठेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नारायण पेठ पोलीस चौकी असलेल्या चौकात मोकळ्या खासगी जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती होती. ही बाब लक्षात घेता प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट न पाहता निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेता ही जागा स्वच्छ करून येथे  वृक्षारोपण व सुशोभिकरण केले आहे. कचरा टाकणा-यांच्या विरोधात गांधीगिरी करीत वृक्षारोपण करुन हा परिसर कचरामुक्त करुन स्वच्छ पुणे सुंदर पुणे व्हावे, याकरीता पाऊल उचलले आहे.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे नारायण पेठ पोलीस चौकीसमोरील कचरा असलेल्या मोकळ्या खासगी जागेत स्वच्छता करुन परिसरात वृक्षारोपण व सुशोभिकरण करण्यात आले आहे. यावेळी उद्योजक कल्याण तावरे, राज देशमुख, संस्थेचे विराज तावरे, स्वप्नील देवळे, स्मृती लोंढे, सुरेखा राठोड, सौरभ कोळुसे, ॠषिकेश भोईटे, संकेत पवार यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा देणारे १०० विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते. सहाय्यक वनसंरक्षकपदी परमेश्वर खेडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आरोग्य सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

विराज तावरे म्हणाले, पुणे शहरात सिमेंटचे वाढते जंगल आणि निसगार्ची झपाटयाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. याचे भान ठेवून हा उपक्रम हाती घेतला आहे. तब्बल ३५ हजार रुपये खर्च करून  संस्थेने कुंड्या-झाडे येथे लावली आहेत. तसेच रंगावली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. खासगी जागेतील कचरा प्रशासन उचलत नाही, त्यामुळे त्याठिकाणी स्वच्छता करुन संस्थेतर्फे वृक्षारोपण व सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न संस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: