Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

‘मराठा वाॅर मेमोरियल’ येथे दीपोत्सवातून हुतात्मा जवानांना मानवंदना

पुणे: शौर्य, बलिदान व त्यागाचे प्रतीक असलेल्या मराठा वाॅर मेमोरियल येथे लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रज्वलनातून हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यात आली. दिव्यांच्या सुवर्ण प्रकाशातून हुतात्मा जवानांचे बलिदान पुन्हा एकदा तेजोमय झाले आणि त्यांच्या स्मरणाने उपस्थितांचे अभिमानाने डोळे पाणावले.

हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी सकल मराठा समाज यांच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त  कॅम्प येथील मराठा वाॅर मेमोरियल येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजाभाऊ चव्हाण, शिवाजी शिंदे, निखिल टेकवडे, विजय महाडिक, राजेंद्र म्हस्के, अक्षय चव्हाण, कुमार शिंदे, ऋषिकेश पवार, अण्णा गव्हाणे, राहुल गावडे, विशाल मोरे, हरीश बोडके, संदीप भोसले, इमाद सय्यद, दिलीप शाह, राजन नायर आणि अ‍ॅड. प्रताप परदेशी यासंह माजी सेनाधिकारी, पोलीस अधिकारी, राजकीय पक्ष व प्रशासनातील पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा वाॅर मेमोरियल हे शौर्य, बलिदान व त्यागाचे प्रतीक आहे. पहिल्या जागतिक महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या गौरवशाली स्मारकाची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स युवराज एडवर्ड यांच्या हस्ते व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत १९ नोव्हेंबर १९२१ रोजी झाली. मराठा वाॅर मेमोरियलचे यंदा शताब्दी वर्ष आहे.

देशभक्ती व शक्तिस्थान असलेल्या या पवित्र वास्तूमुळे भारतीय तरुणांना प्रेरणा व स्फूर्ती मिळते स्मारकाच्या आजूबाजूला १६ व्या शतकातील तीन प्राचीन तोफांमुळे या ठिकाणाच्या गौरवात अधिकच वाढ झाली आहे. स्मारकाच्या शताब्दी वर्षानिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हुतात्मा जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. पारंपररिका वेशात युवती देखील सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading