विश्वशांती सायकल यात्री नितीन सोनवणेचे पुण्यात स्वागत

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती व मैत्री सायकल यात्रेचे भारतात आगमन झाले आहे.४६ देशात १६०९ दिवस सायकल प्रवासाद्वारे गांधी विचाराचा प्रसार करणाऱ्या नितीन सोनावणे याचे १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात स्वागत करण्यात आले. सोमवार,दि.१५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं ६ वाजता गांधी भवन,कोथरूड येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या यात्रेअंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधीभवन) आणि युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता नितीन सोनवणे याने १८ नोव्हेंबर २०१६ पासून आजपर्यंत १६०९ दिवस अखंड सायकल व पायी प्रवास केला आहे.एकूण ४६ देशांमध्ये जाऊन त्याने गांधी विचारांचा प्रचार व प्रसार केला आहे. या असामान्य प्रवासाचा अनुभव घेऊन नितीन भारतात आला . यानिमित्ताने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमाला डॉ कुमार सप्तर्षी,अन्वर राजन , अभय छाजेड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ.प्रवीण सप्तर्षी ,प्रवीण गायकवाड, प्रज्ञेश मोळक, सचिन चौहान,रोहनसिंह गायकवाड,अप्पा अनारसे,कमलाकर शेटे,सुदर्शन चखाले,आदित्य आरेकर संदीप बर्वे ,जांबुवंत मनोहर,सचिन पांडुळे उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

नितीन सोनवणे यांचा खादीची शाल, पुस्तक, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नितीन सोनवणे याने मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला, ‘ गांधी विचारांच्या प्रेरणेने स्वतःचा आणि जगाचा शोध घेण्यासाठी मी हा सायकल प्रवास केला. मानवतेवरील विश्वास या यात्रेतून वाढला. सत्य, अहिंसा यावरील विश्वास वाढला. थायलंड मधून प्रवास सायकलवरून सुरू झाला. पाच वर्ष ४६ देशांचा प्रवास सायकल , पायी प्रवास केला. आपला देश विषमतावादी असल्याची जाणीव झाली.

बुद्ध प्रेरणेने मी ठरवले आणि जो मिळेल तो आहार घेतला. तंबू टाकून राहिलो. अनेक ठिकाणी राहण्याची सोय झाली. पदयात्रा हा जगाशी जोडणारा घटक ठरला. या प्रवासात पुढे मी शाकाहारी झालो. जगाच्या काना कोपऱ्यात जिथे अहिंसात्मक आंदोलने चालू आहेत, तिथे गांधी पोहोचलेले दिसून येतात.

अहिंसा, सहअस्तीत्व हा सत्य आणि शांततेकडे जाण्याचा शाश्वत मार्ग आहे, असे नितिन यांनी शेवटी सांगीतले.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ गांधी सोबत असल्याने नितिन ला जगात अडचण आली नाही. भारतात गांधींना भारतात नावे ठेवायचा उद्योग सुरू असला तरी जगात गांधींनाच सर्वमान्यता आहे, हे या यात्रेतून दिसून आले. भारतातही जिथे हिंसात्मक वातावरण आहे, अशा भागात त्याने प्रवास केला. सर्व सामाजिक कार्यकर्ते मानवाचा म्हणजे देवाचाच शोध घेत असतात. नव्या पिढीने आपल्या घरापुरते, गावापुरते न राहता प्रवास करून जग समजून घेतले पाहिजे.

हे विश्वरूप दर्शन हेच मानवतेचे ईश दर्शन आहे. ही शिदोरी घेऊन नितीनने राष्ट्र बांधणीच्या कार्यात यावे, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: