डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी परिसरात अत्याधुनिक आरोग्य केंद्र उभारणीच्या ठरावास महिला व बालकल्याण समितीची मान्यता

पुणे : डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी परिसरातील (प्रभाग क्रमांक १४ ‘क’) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र , सर्व प्रकारच्या लॅब तपासणी एकाच छताखाली होण्यासाठी नव्याने आरोग्य केंद्र उभारण्यात यावे यासाठीचा ठराव प्रा.सौ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी महिला व बालकल्याण समितीस ठराव दिला होता. या ठरावाचा अभिप्राय देखील महापालिका प्रशासनाने नुकताच महिला व बाल कल्याण समितीस सादर केला होता. काल झालेल्या महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत या विषयाला मान्यता देण्यात आली आहे.

नगरसेविका प्रा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, प्रभाग क्र. १४ क डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या परिसरातील महिलांना व जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी करण्यासाठी पुणे शहरात इतरत्र जावे लागत आहे. हे मला कोरोनाच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवले. म्हणून अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र व त्याच बरोबर प्रभागातील नागरीकांना डायलेसिसची सुविधाही याच आरोग्य केंद्रात मिळावी यासाठी किमान ५ बेड्सच्या डायलेसिस सेंटर सहित आरोग्य केंद्र शिवाजीनगर परिसरात उभारण्यासाठी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती व सहा.आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे यांच्याकडे मी वेळोवेळी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट , चर्चेनंतरच हा ठराव सादर केला.

महापालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील फायनल प्लॉट क्र. ५६६ अ (१२०२ आरोग्य कोठी) जागेचा वापर करण्यात यावा असे ठरले. या जागेपासून १ कि.मी. च्या परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेचे आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध नाही. तसेच उपलब्ध असणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अश्या स्वरुपाच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय चाचण्या एकाच छताखाली महानगरपालिकेमार्फत करण्यात येतील .

या जागेचा वापर करून त्याठिकाणी बहुमजली अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र महिलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी उभारण्यासाठी नगरसेविका प्रा.सौ.ज्योत्स्ना गजानन एकबोटे प्रयत्नशील आहेत. सदर ठिकाणी होणाऱ्या बहुमजली इमारतीचे काम भवन रचना विभागामार्फत करण्यात येणार आहे व सदर आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक लॅब व इतर अनुषंगिक बाबीकरिता सर्व आवश्यक यंत्रसामुग्री सी.एस.आर मधून उपलब्ध होणार आहे. प्रभागामध्ये लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथील गरजू व गरीब रुग्णांना आरोग्य विषयक सेवेचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: