महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन

पुणे  : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुणे विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या महसूल विभागाशी संबंधित शासन निर्णय पुस्तिका व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तयार केलेल्या भूसंपादन विषयक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

दुपारी झालेल्या सत्रात जमाबंदी आयुक्त एन.के. सुधांशू यांनी अभिलेख अद्यावतीकरण कार्यक्रम, मोजणीच्या पारंपारिक व आधुनिक पद्धती या विषयावर सादरीकरण केले. त्यांनी भूमी अभिलेख अद्यावतीकरण, सातबारा संगणकीकरण, डेटा सुधारणा, प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरण, इंटर लिंकेज, डॅशबोर्ड, अभिलेख डिजिटालायजेशन, तलाठी संबंधित समस्या, सातबारा सध्यस्थिती याबाबत मुद्देसूद माहिती दिली.

नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बिनशेती परवानगीबाबत सादरीकरण केले. बिनशेती परवानगीबाबत सुलभ कार्यप्रणाली, कामकाजातील सुसूत्रता, नाशिक विभागातील महत्वाचे अनुभव याबाबत त्यांनी माहिती दिली. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ‘वाळू संबंधित धोरणांनुसार करावयाची कार्यवाही’ या विषयावर सादरीकरण केले. नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि भंडारा अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी ‘वाळू व्यतिरिक्त गौण खनिज संबंधित धोरणानुसार करावयाची कार्यवाही’ या विषयावर सादरीकरण केले. लिलाव कार्यपद्धती, औद्योगिक गौण खनिज लिलाव कार्यपद्धती, अल्पमुदतीचे परवाने, दंडात्मक कार्यवाही आदी विषयाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: