Saturday, May 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

पुन्हा कुटुंबासोबत चित्रपटगृहात आनंदाचा खेळ – ‘झिम्मा’!

असे म्हणतात, ‘प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो…’ त्याची स्वतःशीच नव्याने ओळख होते. आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या ‘झिम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता,तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच चित्रपटाची गाणीही प्रदर्शित झाली आणि ‘झिम्मा’ विषयीची उत्सुकता अधिकच वाढली. इंद्रधनुष्यातील सात रंगांप्रमाणे या सात वेगवेगळी पार्श्वभूमी, स्वभाव असलेल्या स्त्रिया जेव्हा एकत्र इंग्लंड टूरला जातात तेव्हा काय धमाल होते ते ‘झिम्मा’मध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रवासात त्यांचे खटके उडतात, एकमेकींशी काही गोष्टी त्या शेअर करतात, एकमेकींना मानसिक आधार देतात, इतकी वर्षं हरवलेल्या ‘त्या’ स्वतःला पुन्हा नव्याने गवसतात. काही नाती नव्याने निर्माण होतात. असा हा सुंदर खेळ ‘झिम्मा’मध्ये रंगणार आहे.

'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' या चित्रपटाचा ट्रेलर हसतखेळवत बरंच काही सांगून जातो. आयुष्य जगण्यातली मजा आपण आपल्याही नकळत हरवून बसतो, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे. महिलांनीच नाही तर प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.

‘झिम्मा’विषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतात, ” लॉकडाऊनच्या बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी खुली होत आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहातच येऊन पाहावा, दिग्दर्शक म्हणून इंग्लंडमध्ये चित्रित होणारा हा माझा तिसरा चित्रपट आहे. ‘झिम्मा’साठी मी खूपच उत्सुक आहे.मुळात ‘झिम्मा’माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. यातील प्रत्येक कलाकार अभिनयात अव्वल आहेत. यात अनेक कलाकार असल्याने आम्ही सर्वांनीच चित्रीकरणादरम्यान भरपूर धमाल केली आणि ॲाफस्क्रीन केलेली ही धमाल तुम्हाला ॲानस्क्रीनही बघायला मिळेल. विषयही वेगळा आहे. यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उलगडा ‘झिम्मा’ पाहिल्यावरच होईल.”

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग, स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह निर्मित हा चित्रपट १९ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading