भाजपा ओबीसी मोर्चा जागर अभियान रथयात्रेला प्रारंभ
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसने ओबीसी समाजाला व्होट बँक म्हणून वापरण्याचा नेहमी प्रयत्न केला. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा ओबीसी समाजाला ते विसरले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीने ओबीसींना न्याय दिला नाही. महाविकास आघाडीचे हे खरे चित्र जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. याकरीता ओबीसी मोर्चा जागर अभियान रथयात्रा उपयुक्त ठरेल असे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे ओबीसी मोर्चा जागर अभियान रथ उद््घाटन कार्यक्रमाचे आयोजन कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे करण्यात आले. यावेळी आमदार मुक्ता टिळक, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे, प्रमोद कोंढरे, तुषार रायकर, बापू नाईक आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून हे अभियान महाराष्ट्रात सुरु आहे.
मुळीक म्हणाले, सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले. भाजपा ने हा मुद््दा घेऊन आंदोलने केल्यानंतर २७ टक्के आरक्षण देण्यात आले. निवडणूक आली की महाविकास आघाडीला ओबीसी समाजाची आठवण होते.
स्वरदा बापट म्हणाल्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ओबीसींना न्याय देण्याचे काम करण्यात आले. आता पुण्यामध्ये ओबीसी संघर्ष रथयात्रेतून उभा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
योगेश पिंगळे म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. यापुढे नोकरी व शिक्षणावर गदा येऊ नये म्हणून शासनाला जाग करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस पुण्यातील आठही मतदारसंघात या रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात ओबीसी समाजाचे २७ खासदारांना मंत्री केले. याउलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ३३ टक्क्यावरील आरक्षण २७ टक्क्यांवर आणले आहे. ही परिस्थिती रथयात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यशोधन आखाडे, दीपक माने, बंडू कचरे, अमोल पांडे, विशाल केदारी, दिनेश रासकर, पंकज गिरमे, संजय सातव, बापू नाईक, विकी ढोके, भीम देवकाते, गहिनीनाथ राजे, दिलीप पवार, रोहन कोद्रे, स्मिता गायकवाड, संदीप कर्देकर, सागर धोत्रे आदींनी संयोजनात सहभाग घेतला आहे. शंतनु नारके, सुनील रसाळ यांनी सूत्रसंचालन केले.
