Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

दगडखाण कामगारांकडून भूगर्भातील मौल्यवान वस्तुरुपी सुख वाटण्याचे काम – डॉ.सदानंद मोरे

पुणे : इतिहासात सांगितले जाते कि भूगर्भात अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी बाहेर काढण्याचे काम दगडखाण कामगार करीत असतात. अतिशय मौल्यवान गोष्टी काढण्याचे काम जे करतात, त्यांना हवा तसा न्याय मिळत नाही. विठू माऊली ही एक खाण आहे, जी अतिशय समृद्ध आहे. प्रेम, सुख हे परमात्म्याकडून मिळते. दगडखाण कामगार हे ख-या अर्थाने संत आहेत. भूगर्भातील सुख काढून वाटण्याचे काम दगडखाण कामगार करीत असतात, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन, राष्ट्रप्रेमी युवा मंच, डायॉसिस आॅफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथील संतुलन पाषाण शाळा येथे दगडखाण कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छंद पुणे यांच्यातर्फे कामगारांसाठी संगीत संध्या सादर करण्यात आली. तसेच कामगार कुटुंबांकरीता फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे धर्मप्रांत बिशप डॉ. थॉमस डाबरे, अ‍ॅड. बी.एम.रेगे, पल्लवी रेगे, संतुलन पाषाण संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, पार्वती चव्हाण, पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशनचे गणेश चव्हाण, राष्ट्रप्रेमी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष भोला वांजळे, प्रा.रवींद्र शाळू, विद्या यंदे, पराग मते, राज देशमुख आदी उपस्थित होते. पुणे धर्मप्रांताच्या वतीने ५० हजारांची देणगी संतुलन पाषाण शाळेला बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी दिली.

डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, समाजात कोणालाही कमी लेखू नये. पण आज याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. काही लोक श्रेष्ठ तर काहींना कनिष्ठ समजले जाते. परंतु समाजातील प्रत्येकाला समान दर्जा द्यायला हवा. सर्वांचा सन्मान करायला हवा. एकमेकांना प्रोत्साहन दिले, तर समाजातील सर्वजण पुढे येतील. लोकांना संधी दिली, तर लोक पुढे येतील. कष्टकरी लोक आनंदी आणि समाधानी आहेत. त्यांना संधीची खरी गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

गणेश चव्हाण म्हणाले, दगडखाण कामगार हा घटक कष्टकरी म्हणून ओळखला जातो. त्यांचे शिक्षण, आरोग्य या दृष्टीने मोठया प्रमाणात काम होणे आवश्यक आहे. दिवाळी सारखा सण त्यांच्यासोबत साजरा करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. रवींद्र शाळू, अनघा धायगुडे, आरती दीक्षित, प्रा. विद्या नितीन यांनी संगीत संध्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. महिलांची रांगोळी स्पर्धा व मुलांची किल्ले स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांची सर्व बक्षिसे पिताश्री-मातोश्री निर्मला पंढरी वांजळे प्रतिष्ठानतर्फे मनिषा वांजळे यांनी दिली. भोला वांजळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.बी.एम.रेगे यांनी प्रास्ताविक केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading