पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची शक्यता

पुणे:गेल्या तीन-चार दिवसांपासून दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि केरळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. सध्या तामिळनाडू किनारट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असून पुढील काही दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पण विकेंडनंतर राज्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात पुढील 12 तासांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पावसाचा प्रकोप असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: