दोशी इंजिनियर्स करंडक –  केडन्स क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद 

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत जलदगती गोलंदाज इझान सय्यद(5-26) याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले. 
 
पूना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. केडन्सच्या इझान सय्यद(5-26), शुभम हरपाळे(4-21) यांच्या भेदक माऱ्यापुढे अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा डाव 27षटकात 132 धावावर कोसळला. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे 13.4षटकात 9बाद 43 धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर संकेत फराटे(68धावा) व वैभव विभुते(नाबाद 21) यांनी दहाव्या गड्यासाठी 81चेंडूत 89धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 132 धावांचे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 22.3षटकात 4बाद 134धावा करून पूर्ण केले. यात ऋषिकेश मोटकर(51धावा) व हर्षल काटे(नाबाद 26) यांनी पाचव्या गड्यासाठी 85चेंडूत 82धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.  अँबिशियस क्रिकेट अकादमीकडून तनय सांघवीने 33 धावात 3 गडी बाद केले. सामन्याचा मानकरी इझान सय्यद ठरला. 
 
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे सचिव रियाज बागवान आणि दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पूना क्लबचे शशांक हळबे आणि दिनयार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. 
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 

अँबिशियस क्रिकेट अकादमी: 27षटकात सर्वबाद 132 धावा(संकेत फराटे 68(39,8×4,5×6), वैभव विभुते नाबाद 21(49), इझान सय्यद 5-26, शुभम हरपाळे 4-21, हर्षल काटे 1-12)पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 22.3षटकात 4बाद 134धावा(ऋषिकेश मोटकर 51(67,7×4,2×6), हर्षल काटे नाबाद 26(34), निपुण गायकवाड 10, तनय सांघवी 3-33, संकेत फराटे 1-31);सामनावीर-इझान सय्यद; केडन्स संघ 6 गडी राखून विजयी.
 
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: ओमकार आखाडे(238धावा, पूना क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: शुभम हरपाळे(केडन्स, 17विकेट);
मालिकावीर: धीरज फटांगरे(डेक्कन जिमखाना, 208धावा)

Leave a Reply

%d bloggers like this: