मनातील एकटेपणाची भावना दूर करण्याचा प्रयत्न व्हावा – विनायक डंबीर

पुणे : समाजाच्या प्रत्येक घटकाला कधी ना कधी दु:खाला सामोरे जावे लागते. जरी दु:ख आले, तरी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या माणसाच्या रुपात येथून दु:खी, पिडीताला मदत देत असतो. माणसाच्या मनातील एकटेपणाची भावना नाहीशी करण्याचा प्रयत्न परमेश्वर यामाध्यमातून करतो. त्यामुळे एकटेपणाची भावना दूर करत, दु:ख सहन करण्याची ताकद दे, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करुया, अशी भावना जनकल्याण समिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह विनायक डंबीर यांनी देवदासी महिलांशी बोलताना व्यक्त केली.

जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे व प्रभात जन प्रतिष्ठान गुरुवार पेठ तर्फे बुधवार पेठेतील ५१ देवदासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करुन त्यांना धान्य किट भेट देण्यात आले. बुधवार पेठेतील श्री नामदेव शिंपी समाज कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव, जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.मधुरा कसबेकर, सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, रुपेश नाईक आदी उपस्थित होते. तब्बल २५ वस्तू व धान्य असलेले किट महिलांना भेट देण्यात आले. सोसायटीचे अविनाश निरगुडे, विजय फाटक, प्रतिष्ठानचे राजेंद्र भुतकर, उदय वाडेकर, मंगेश शिंदे, विवेक फुले, कुणाल जगताप, शिवराज बलकवडे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

रविंद्र देव म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीशी वंचित-शोषित सामना करीत असतात, त्यावेळी छोटया-छोटया संस्था त्यांना मदत करण्याकरीता कार्यरत असतात. यामुळे कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे बळ गरजूंना मिळते, असेही त्यांनी सांगितले. डॉ.मधुरा कसबेकर म्हणाल्या, आयुष्याच्या उतारवयात आपल्या सर्व गोष्टी आपल्या स्वत:ला करता आल्या पाहिजेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्याकरीता विशेषत: महिलांनी व्यायाम, सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे. तरच शरीर व मन आपल्याला साथ देईल.

किशोर चव्हाण म्हणाले, आपल्या घरात दिवाळी साजरी करताना समाजातील प्रत्येक घरात दिवा लागला पाहिजे, या भावनेने जनता बँकेतील कर्मचा-यांनी सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविला आहे. सलग १० वर्षे हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. भावाकडून बहिणीला ओवाळणी म्हणून हे धान्य व वस्तूंचे किट देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा परदेशी, शरद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: