सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार – शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे – पुढील पाच वर्षांत राज्यातील एकही गड असुरक्षित राहणार नाही. तसेच, गडांची डागडुजी, सुशोभीकरण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी व्यक्त केला.
पुणे शहर शिवसेनेतर्फे आयोजित किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण अहीर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, विजय देशमुख, पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, महिला आघाडीच्या शहर संघटिका संगीता ठोसर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, अनंत घरत आदी यावेळी उपस्थित होते.
अहीर म्हणाले, अलीकडे मोबाईलमुळे पुस्तकरूपी इतिहास वाचणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, त्यांची कीर्ती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन किल्ले स्पर्धासारख्या उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे.
बारणे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढून त्याचे ‘महाराष्ट्र देशा’ हे उत्तम पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून राज्यातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाचे दर्शन अनेकांना झाले. किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून छत्रपतीशिवाजी महाराजांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे.
संजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. रमेश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दीनानाथ साठे, सदाशिव भिसे,गणेश टोकेकर, देवा कांबळे, दत्ता भारती, श्रीकांत शिर्के, श्रीकांत रेणके, रुपाली देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत लहान गटात प्रथम जय-जवान मित्रमंडळ, द्वितीय रिहान सय्यद, तृतीय अनुज भुजबळ, चतुर्थ क्रमांक तंजाली शिळीमकर ग्रुप, तर उत्तेजनार्थ जयनाथ ग्रुपने पटकाविला. मोठ्या गटात प्रथम योगेश विस्तुने, द्वितीय विशाल गव्हाणे, तृतीय राजेश मांढरे, हिरामण कोळेकर, चतुर्थ क्रमांक समीर भगत, शिवयोगी प्रतिष्ठाण यांनी पटकाविला.

Leave a Reply

%d bloggers like this: