तब्बल ४० फूटी प्रतिकृतीतून जीवंत झाला पानिपताचा रणसंग्राम

पुणे :  तो दिवस होता १४ जानेवारी १७६१… पानिपताच्या रणांगणात दोन विशाल सेना एकमेकांना भीडल्या. अब्दालीच्या अफगाण सेनेशी टक्कर देण्यास सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य सज्ज झाले. भयंकर युद्ध सुरु आले. सदाशिव व विश्वास ही दोन मोत्ये गळाली. सत्तावीस मोहरा हरपल्या. समरभूमीवर सव्वा लाख बांगडी फुटली. परकीय आक्रमकांशी मराठ्यांनी केलेल्या प्रखर संघर्षामुळे हिंदुस्थानचे रक्षण झाले. ही पानिपताची शौर्यगाथा महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. ही शौर्यगाथा तब्बल ४० फूटी पानिपताचा रणसंग्राम या प्रतिकृतीतून साकारण्यात आली आहे.

पानिपताच्या युद्धाला २६१ वर्षे पूर्ण आणि श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने दुर्ग प्रदर्शनाचे आयोजन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ऑलम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते.

पानिपताचा रणसंग्राम ही चाळीस फूट लांबीची भव्य प्रतिकृती, अभ्यासपूर्ण निवेदन, हजारो दिव्यातून उलगडत जाणारी युद्धकथा आकर्षक चित्रफीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर होणारा साउंड अँड लाईट शो या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहेत

अनिकेत कमबेकर आणि अर्जुन पेटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून त्यांचा जीवन प्रवास उलगडला गेला. या प्रसंगी तनिष व्यंकटेश, प्रसाद मोरे, अनुष चांदवले या युवकांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांना प्रास्ताविक केले व प्रणव जोशी याने सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन ११ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते २ व दुपारी ५ ते १० या वेळेत बघण्यासाठी सुरु राहणार आहे.

मोहन शेटे म्हणाले, पानिपतचे युद्ध ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्यगाथा आहे. सदाशिवभाऊ व विश्वासराव यांच्यासह लक्षावधी मराठ्यांचे या समरभूमीवर बलिदान झाले, मात्र परकीय आक्रमणाच्या विरुद्ध देशाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी केलेल्या विलक्षण पराक्रमाचे दर्शन साऱ्या जगाने घेतले. या प्रदर्शनातून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला मानवंदना दिली जाणार आहे. तरी पुणेकरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: