समाजाने ट्रान्सजेंडर विषयी सहवेदना बाळगाव्या – लक्ष्मीकांत देशमुख

पुणेः- स्त्री आणि पुरूष यांना जशा भावना असतात, तशाच भावना आणि तिच संवेदनशीलता ट्रान्सजेंडर बाळगून असतात. स्त्री लिंग आणि पुरूष लिंग यापलीकडे ही लिंग अस्तित्वात आहे, हे स्वीकारून या ट्रान्सजेंडर यांना समाजात सर्वसमावेशकता मिळावी. समाजाने ट्रान्सजेंडर विषयी सहवेदना बाळगाव्या असे मत, ज्येष्ठ लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

आडकर फौंडेशन आणि डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चांगुलपणाची चळवळ’ या दिवाळी अंकाचे लोकर्पण देशमुख यांच्या हस्ते आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अविनाश भोंडवे, सचिन ईटकर, अॅड. प्रमोद आडकर, ट्रान्सवुमन सोनाली दळवी आणि दिवाळी अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, एखादा पुरूष स्त्री भावना आणि एखादी स्त्री पुरूष भावना बाळगत असेल, तर या विरोधाभासाचे दमन कुटुंबापासूनच सुरू होते. हे स्त्रीभान आणि पुरूषभान या संज्ञा प्रगल्भ होऊन त्याचा प्रारंभ कुटुंबापासूनच होणे आवश्यक आहे. ट्रान्सजेंडरचे दुःख मानवी दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक आहे. उपेक्षित लोकांचे अंतरंग अशा साहित्य कृतीतून वारंवार प्रकर्षाने पुढे येऊन समाजाची संवेदनशीलता जागवली पाहिजे. तुलनेने मराठी भाषेत या विषयावर लेखन फार कमी आढळते. ट्रान्सजेंडर हे अल्पसंख्यांक असल्याने त्यांना समाजातून बेदखल करावे का? त्यांची नोंदच घ्यायची नाही का ? असे प्रश्नहीत्यांनी यावेळी उपस्थित केले.

यावेळी बोलतांना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी हे सगळे वेगवेगळे घटक आहेत. या सगळ्यांना एकच टॅग लावला जातो. मूळात या घटकांभोवतीच्या प्रश्नांबाबत समाजात अनास्था आणि संभ्रम आढळून येतो. वैद्यकीय शास्त्र शिकत असतांना स्त्री आणि पुरूष यांच्याच शरीराविषयी शिकवले जाते. या विषयां संदर्भात आत्ता आत्ता चर्चा व्हायला लागली आहे. त्यामुळे वैद्यक शास्त्राशी संबंधित व्यक्तींना देखील हा विषय तितकाच नवीन आहे.

यावेळी बोलतांना ट्रान्सवुमन सोनाली दळवी म्हणाल्या की, समाजाने आम्हाला स्वीकारावे, अशी तजवीज कायद्याने केलेली आहे. परंतू अजूनही समाजाकडून स्वीकारहारता वाढलेली नाही. आजही आमचा समुदाय मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. सरोगसी, मूल दत्तक घेणे, याचे संविधानाने दिलेले अधिकार देखील आम्हाला अजून मिळालेले नाहीत. आमचा समुदाय शिक्षण आणि आरोग्य सुविधांपासून आजही वंचित आहे. समाजात समान वागणूक मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. कोरोना काळात सर्वसामान्य लोकांनी लॉकडाऊनच्या निमित्ताने विलगीकरणाचा अनुभव घेतला. परंतु, आम्ही तर जन्मापासूनच विलगीकरणात आहोत.

यावेळी दिवाळी अंकाच्या संपादिका शुभांगी मुळे यांनी तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर यांच्या जीवनाच्या विविध आयामांवर आधारित आगळ्यावेगळ्या दिवाळी अंक निर्मिती मागील भूमिका विशद केली. अॅड. दिलशाद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: