‘जनजन दिवाळी, दिवाळी जनसामान्यांची’ काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास प्रारंभ

पुणे – कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी दिवाळी होऊ शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी सेवाभावी वृत्तीने साजरी करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे, असे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ‘जनजन दिवाळी ‘कार्यक्रमात बोलताना सांगितले.

‘जनजन दिवाळी, साथ काँग्रेसची, दिवाळी जनसामान्यांची’ या उपक्रमाचा प्रारंभ फुरसुंगी येथे रविवारी करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिनकर हरपळे, राहुल चोरघडे, प्रशांत सुरसे, कामठे-सर, अण्णा कदम, पल्लवी सुरसे आदी उपस्थित होते. श्री बालाजी सेवा प्रतिष्ठान आणि भेकराई माता महिला सखी मंच यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. यावेळी आदर्श शिक्षक, सफाई कामगार, पीएमपी कर्मचारी, महापालिका कर्मचारी, रिक्षा चालक यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार मोहन जोशी म्हणाले,आपापल्या भागातील जनसामान्यांना धान्य, उटणे, लक्ष्मी पूजनाचे साहित्य, कंदील, पणत्या याचे वाटप, अनाथ मुलांना स्वेटर किंवा कपडे, रिक्षा चालकांना सीएनजी रिफील कुपन वाटप, सफाई कामगार महिलांना साडी, पुरुषांना कपडे वाटप, रस्त्यावरील निराधार मुलांना अभ्यंग स्नान तसेच गोडधोड पदार्थाचे वाटप करणे, सामुदायिक भाऊबीज करणे असे कार्यक्रम जनजन दिवाळी उपक्रमातून राबविले जात आहेत.

कोरोना साथीच्या काळात पोलीस, आरोग्यसेवक, रुग्णवाहिका चालक, डॉक्टर्स यांनी जोखीम घेऊन कामगिरी केली याबद्दल त्यांचा सन्मान काँग्रेसच्या वतीने दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी केला जात आहे. शिवाय स्थानिक पातळीवर दीप महोत्सवाचेही आयोजन केले जात आहे, असेही मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पोलादी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. देशातील सद्यस्थिती पाहाता या दोन खंबीर नेत्यांची आठवण येते, असे बाळासाहेब शिवरकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. सेवाभावी वृत्तीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क साधा, असे आवाहन शिवरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सर्वांचे स्वागत सुधा हरपळे यांनी केले, संजय हरपळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: