fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ऑक्टोबर हीटचा कालावधी पुढील काळात राज्यातून कालबाह्य होण्याची शक्यता

पुणे:यंदा सलग दुसऱ्या वर्षी ऑक्टोबर हीटचा कालावधी गायब झाला असून, कडाक्याची थंडीही लांबणीवर पडली आहे. अंगातून घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही करणारा ऑक्टोबर हीटचा कालावधी पुढील काळात राज्यातून कालबाह्य होण्याची शक्यता आहे. पावसाचा कालावधी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत वाढत असल्याने हा परिणाम दिसून येत असल्याचे पुणे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे.

पावसाचा कालावधी वाढत असल्याने ऑक्टोबर हीटची स्थिती जाणावत नाही. गेल्या वर्षीही नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे असेच वातावरण होते. यापुढेही असे होण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरणात सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत येण्यात अडथळा येतो आणि जमीनही तापत नाही. त्यामुळे तापमानात वाढ होत नाही. यंदाही ऑक्टोबरमध्ये ते दिसून आले. थंडीचा कालावधीही त्यामुळे पुढे गेला असून, दिवाळीनंतरच थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
असे मत डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केले.

मोसमी पावसाच्या प्रवासाचे वेळापत्रक गेल्या काही वर्षांपासून बदलले आहे. मोसमी पाऊस राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करत असतो. त्याची नियोजित तारीख पूर्वी १ सप्टेंबर होती. परतीचा कालावधीत सातत्याने वाढत असल्याने हवामान विभागाने काही वर्षांपूर्वी ही तारीख १७ सप्टेंबर केली आहे. मात्र, या तारखेलाही मोसमी पाऊस हुलकावणी देत असून, तो उशिरानेच परतत आहे. यंदा १९ दिवस उशिराने ६ ऑक्टोबरला राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाला. राज्यात १४ ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे कार्यरत होते. चार महिने नऊ दिवस मोसमी वाऱ्यांचे राज्यात अस्तित्व होते. त्यानंतरही बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांत पाऊस झाला. याच स्थितीमुळे ऑक्टोबर हीटचा कालावधी जाणवला नाही.
पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबरमध्ये तापमानात मोठी वाढ झाली नाही. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रामुख्याने विदर्भात दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास जात होते. इतर ठिकाणीही तापमानात मोठी वाढ होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यातील तापमानात मोठी वाढ दिसून आली नाही. यंदा बहुतांश दिवशी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या आतच होता. काही भागांत तो ३२ अंशांच्या पुढे जाऊ शकला नाही. पुढेही पावसाचा कालावधी असाच वाढत राहिल्यास ऑक्टोबर हीटचा कालावधीच कालबाह्य होण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading