त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, आपले समाधान द्विगुणीत करणारा खा. सुप्रिया सुळे यांची भावना

पुणे : ‘कर्णबधिर मुलांच्या कानावर ध्वनीलहरी गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद माझे समाधान द्विगुणित करतो’, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याच पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत श्रवणयंत्र वतापपूर्व तपासणी शिबिरास भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप, मुंबई, स्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित या तपासणी शिबिरात एकूण सातशे जणांची तपासणी करण्यात आली. यात ज्येष्ठ नागरिक आणि मुलांचाही समावेश होता.

सुळे यांच्या पुढाकारातून हे दोन दिवसांचे तपासणी शिबीर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या निसर्ग कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. काल आणि आज असे दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात झालेल्या या शिबिरास स्वतः सुप्रिया सुळे यांनी काल दुपारी भेट देऊन शिबिरार्थींशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

त्यांच्याशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘तुम्हा सर्वांना पूर्ववत ऐकू यावे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. ऐकू न येण्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संवाद साधू शकत नाहीत, मुले सर्व साधारण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. श्रवणयंत्र बसवून दिल्यानंतर त्यांच्या कानावर ध्वनी लहरी गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद अत्यंत समाधान देणारा असतो’. हा उपक्रम २०१३ पासुन आपण राबवत असून यापुढेही असाच चालू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या दोन दिवसांत तपासणी झालेल्या सर्वांना पुढील महिनाभरात स्वतंत्र शिबीर आयोजित करून मोफत श्रवणयंत्र बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात उपक्रम राबविण्याचा माणस
केवळ श्रवणयंत्र नसल्यामुळे ऐकू न येणारे आणि वयामुळे ज्यांना कर्णबाधिरत्व आलेले आहे अशा महाराष्ट्रातील प्रत्येकाला ऐकू येण्यासाठी हा उपक्रम राज्यभर टप्याटप्याने राबविण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत आम्ही या उपक्रमा द्वारे आम्ही ४० हजार जणांना श्रवणयंत्र वाटले आहे. भविष्यात आणखी जास्तीत जास्त कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: