मिळतकर विभागाकडून ऑक्टोबरपर्यंत ३६ हजार ८६६ मिळकतींची नोंद झाली

पुणे: गेल्यावर्षी ४७ हजार ६६६ नव्या मिळकतींची नोंद झाली होती, यंदा ऑक्टोबरपर्यंत ३६ हजार ८६६ मिळकतींची नोंद झाली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी पाच महिने असल्याने विक्रमी मिळकतींची नोंद होईल. तसेच नव्याने विकल्या गेलेल्या फ्लॅटची पुढील काळात नोंद वाढण्याची शक्यता आहे.” अशी माहिती विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग मनपा यांनी दिली.

जुन्या मिळकतींची वसुली करण्याकडे महापालिका प्रशासनाचा भर असला तरी त्याच बरोबरीने नव्याने बांधकाम झालेल्या मिळकतींना कर लावून वसूल करण्यासाठीही यंत्रणा काम करत आहे. मिळकतकर विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर पथक नियुक्त केले आहे. २०१९-२० पासून नव्याने मिळकतींची नोंदणी होण्याचे प्रमाण वाढले असून, २०१९-२० मध्ये ३८ हजार ९६८ मिळकतींची नोंद झाली होती. २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ४७ हजार ६६६ मिळकतींची नोंदणी झाली असून त्यामाध्यमातून २१५ कोटी ७६ लाखाचे उत्पन्न मिळाले. २०१९-२० पूर्वी सरासरी २५ हजार मिळकतींचीच नोंदणी होत होती. अनेक इमारतींना कर लावलेला नसल्याचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत होते.

२०२१-२२ मध्ये शहराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला, पण शासनाकडून मुद्रांक शुल्काची देण्यात आलेली सवलत, गृहकर्जाचा कमी झालेला व्याजदर व कमी झालेले दर यामुळे नागरिकांनी घर खरेदीस प्रतिसाद दिला. १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर पर्यंत महापालिकेकडे ३६ हजार ८६६ नव्या मिळकतींची नोंद झाली आहे. यातून १९५ कोटी ३७ लाखाच्या उत्पन्नाची भर पडली आहे. तसेच अनेक फ्लॅट विक्रीला गेले असले तरी अद्याप त्यांची नोंद पालिकेकडे झालेली नाही. भविष्यात ती नोंद होणार असल्याने यंदाच्या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जास्त नव्या मिळकतींची नोंद होणार आहे.

कोरोनाच्या सावटातही फ्लॅट विक्री वाढत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. यंदा सात महिन्यांत ३६ हजारपेक्षा जास्त मिळकतींची नोंदणी मिळकतकर विभागाकडे झाली आहे.यातून महापालिकेला १९५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा गतवर्षीचा विक्रम मोडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने विकासकामांवर परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी आवाहन केले होते. त्यास पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पहिल्या तीन महिन्यांत ८४६ कोटी रुपये जमा झाले होते. गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त होते.

Leave a Reply

%d bloggers like this: