पुणेकरांनी ‘स्वरपर्व’द्वारे अनुभविली स्वरांनी उजळलेली सायंकाळ

पुणे  : स्वरांनी न्हाऊन निघालेली संध्याकाळ अनेक महिन्यांनंतर पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभविली… निमित्त होते तालानुभूती फाउंडेशनतर्फे आणि परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन, विलास जावडेकर यांच्या सहकार्याने आयोजित स्वरपर्व या कार्यक्रमाचे.

उदयोन्मुख आणि प्रतिथयश कलाकारांच्या कलेचा मिलाफ असणारा हा कार्यक्रम मयूर कॉलनी येथील बालशिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात पार पडला.

प्राज कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे विलास जावडेकर, तालानुभुती फाऊंडेशनचे संस्थापक रोहित मुजुमदार, सचिव सुधीर दर्भे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

श्रुती मोदगी यांच्या गणेशवंदना सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांनी राग शुद्ध बरारीतील विलंबित एकतालामधील ‘सुधे बोलत नाही…’ ही रचना सादर केली. याच रागातील छोटा ख्याल मधील ‘कुंज बिहारी थारी रे, बांसुरी लागे म्हारी प्यारी…’ ही मध्यलय तीनतालातील बंदिश त्यांनी गायली. ‘नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू…’ या अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अभिषेक शिनकर (संवादिनी) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला), मानसी महाजन (तानपुरा) यांनी साथ दिली.

यानंतर पंडित शेखर बोरकर यांचे शिष्य अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन झाले. त्यांनी सरोदवर फारसा न वाजविला जाणारा असा राग गावती सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी राग मिश्र पिलू ताल दादरा सादर केला. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके आणि तानपु-यावर सिद्धार्थ शुल्का यांनी साथ दिली.

कार्यक्रमाची सांगता ग्वालियर घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. वीणा सहत्रबुद्धे यांच्या शिष्या व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने झाली. यावेळी बोलताना शेंडे म्हणाल्या, ”मागील दोन वर्षांत आपण किमान कार्यक्रम सुरू ठेवावेत या उद्देशाने ऑनलाईन माध्यमाद्वारे भेटत होतो. मात्र समोरासमोर भेटायची मजा वेगळीच आहे. आज रसिकांसमोर गायन कला सादर करण्याची संधी मिळत आहे, याचा आनंद आहे.”

सावनी शेंडे यांनी राग मारुबिहागने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित एक तालातील ‘रतीयां मैंतो जागी रे…’ हा ख्याल सादर केला. त्यानंतर मध्यलय तीनताल मधील ‘जाओ सजना, मैं नाही बोलू…’ ही  रचना आणि दृत एकतालातील तराणा या स्वरचित रचना सादर केल्या. मिश्र पहाडी मधील ‘झिनी झिनी अंचरवा के पार गोरिया’ हा दादरा सादर करीत त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

त्यांना पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित मुजुमदार (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), गीतांजली हरळ व श्रुती महाजन (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: